Type Here to Get Search Results !

महापरिनिर्वाण दिनानिमित्त "BLOOD FOR BABASAHEB" ! अंतर्गत १६० रक्तदात्यांचे स्वयंस्फूर्तीने रक्तदान

शासकीय रक्तपेढी आणि परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्थेचा संयुक्त उपक्रम

सोलापूर : विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर आणि परिवर्तन समूह बहुउ‌द्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शासकिय रक्तपेढीमार्फत शुक्रवारी, ६ डिसेंबर रोजी सकाळी ८:०० ते सायंकाळी ८:०० या वेळेत ' BLOOD FOR BABASAHEB ' अर्थात ' माझे रक्त बाबासाहेबांसाठी ' या उपक्रमांर्गत हुतात्मा स्मृती मंदिराच्या पार्किंग मधे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना या दिवशी श्र‌द्धांजली वाहण्यासाठी जगभरात रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे. अमेरिका, लंडन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दुबई या देशांसह भारतातील २० राज्यांमध्ये अन् महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यांमध्ये ' ब्लड फॉर बाबासाहेब ' या अंतर्गत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते. याचाच एक भाग म्हणून सोलापुरात हुतात्मा स्मृती मंदिराच्या प्रांगणात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिराचे उ‌द्घाटन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. ठाकूर यांनी रक्तदानाचे महत्त्व विषद केले. शिबीराचे समन्वयक डॉ. औदुंबर मस्के व परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्थेच्या सचिवा श्रीमती अमृता अकलुजकर यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रा. उदय ढाले व डॉ. सुशील सोनवणे यांनी शुभारंभाचे रक्तदान केले तर इतर रक्तदात्यांसमवेतच वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. संपत्ती तोडकर, डॉ. सचिन बंदीछोडे, डॉ. गजानन जत्ती, डॉ. कमलाकर माने, डॉ. सरवदे, डॉ. शुक्लधन रोडे, डॉ. संचित खरे, डॉ. वैभव लादे व डॉ. औदुंबर मस्के यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनीही रक्तदान केले. परिवर्तन समूह संस्थे मार्फत अमृता अकलुजकर, राज लामतुरे, मनिष काटे, विजयालक्ष्मी अकलुजकर (वय-५९वर्षे) या संस्थेच्या सभासदांनी तसेच मित्र परिवाराने रक्तदान केले.

शिबिराच्या उ‌द्घाटनप्रसंगी डॉ. दंतकाळे, डॉ. स्मिता शेटे, डॉ. सरोज बोल्दे, अॅड. रवी गजधाने, अशोक मस्के, आनंद शिंदे तर परिवर्तन समूह बहुउ‌द्देशीय संस्थेकडून भारत अकलुजकर, अनिल पवार, जगदीश बिडकर, शीतल अकलुजकर, सुरेखा अकलुजकर व मंगळवेढेकर मॅनेजमेंट इंस्टिट्यूट चे स्वयंसेवक उपस्थित होते.

परिवर्तन समूह संस्थेला रक्तदात्यांना अल्पोपहार देणे साठी एचडीएफसी बँकेने मदत केली. महापरिनिर्वाण दिनी Blood For Babasaheb या बॅनर अंतर्गत 160 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले.