ऑपरेशन ' मुस्कान 'च्या समयसूचकेमुळे ३ वर्षीय ' स्वराज ' आईच्या कुशीत

shivrajya patra

आपापल्या पाल्याची घ्यावी योग्य ती खबरदारी : वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने

सोलापूर : फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीतील ब्रँड ॲम्बेसिडर हॉटेलजवळ ३ वर्षीय चिमुकला बेवारस स्थितीत रडत असल्याचं पाहून बीट मार्शल पोलीस शिपाई वामने यांनी त्या परिसरात चौकशी करून बालकास पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांच्या समयसूचकेमुळे त्याचं छायाचित्र सोशल प्लॅटफॉर्म वर प्रसारित केल्यावर त्याची ओळख पटण्यापासून पालकांसंबंधी खात्री झाल्यावर स्वराज आईच्या काखेवर बसला. पालकांनी आपापल्या पाल्याची योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी केलय.

प्रारंभी बीट मार्शल पोलीस शिपाई वामने यांनी त्या बेवारस बालकास सोबत घेऊन आजूबाजूच्या परिसरात नातेवाईकांचा शोध लागतो का ? याची सखोल चौकशी केली, मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. पालकांचा शोध न लागल्याने त्यास फौजदार चावडी पोलीस ठाण्यात नेले. तेथे पोलीस आयुक्तालय अंतर्गत कार्यरत असलेल्या ऑपरेशन मुस्कान पथकाच्या ताब्यात सुपूर्द केले.

ऑपरेशन मुस्कानच्या पथकाने या बालकास आपल्या ताब्यात घेऊन त्याचा फोटो पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करून या बालकाचा फोटो सोशल प्लॅटफॉर्मवर पोलिसांनी प्रसारित केला. याद्वारे स्वराज च्या पालकांचा शोध लागला. त्यानुसार पोलिसांनी स्वराज च्या पालकांना फौजदार चावडी पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. पोलिसांनी ते त्याचे पालक असल्याची खात्री केली, खात्री पटल्यावर त्यास त्याच्या आईच्या कुशीत दिले.

ऑपरेशन मुस्कान पथकाने पालकांचा अवघ्या ४ तासात शोध घेऊन त्याला पालकांकडे सोपवून पुन्हा एकदा सतर्क पोलिसींगचं दर्शन घडविलंय. या कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त एम राज कुमार आणि फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी पथकाचे विशेष कौतुक केलं आहे.

पोलिसांचं आवाहन

पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सोलापूरकरांना आवाहन करण्यात येते की, स्वराज सारखी अजान बालकं शहरात आढळून आल्यास तात्काळ संबंधित पोलिस ठाण्याशी संपर्क साधून माहिती द्यावी, जेणेकरून अशी मुले सुखरूपरित्या त्यांच्या घरी पोहोचतील. तसेच पालकांना आपल्या पाल्यासंबंधी योग्य ती खबरदारी घ्यावी, असंही आवाहन करण्यात आलंय.

To Top