सोलापूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आजन्म विद्यार्थी होते, त्यांनी कधीही आपल्या परिस्थितीचे कारण पुढं न करता ज्ञान संपादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञांनामुळेच आज भारतीय संविधान हे जगात सर्वश्रेष्ठ संविधान म्हणून गणले जाते, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक, निवृत्त शिक्षणाधिकारी योगिराज वाघमारे यांनी काढले.
अक्कलकोट रोड, सोलापूर येथील सदसंकल्प शिक्षण समुहाच्या राष्ट्रसंत प्राथमिक शाळा आणि विश्वभूषण विद्यालय येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सचिव समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर हे होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पुढे बोलताना योगिराज वाघमारे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, शैक्षणिक, कायदेविषयक, अर्थशास्त्र, इ. कार्यावर प्रकाश टाकला. यावेळी समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची सखोल माहिती सांगितली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. शिवाजी बनसोडे यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष वाघमारे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी केले. शेवटी सत्यवान पाचकुडवे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रसंत प्राथमिक शाळा आणि विश्वभूषण विद्यालयाचे सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं सहकार्य लाभले.
फोटोओळी : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करतेवेळी ज्येष्ठ साहित्यिक योगिराज वाघमारे, अण्णासाहेब भालशंकर, शिवाजी बनसोडे, सत्यवान पाचकुडवे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी दिसत आहेत.