27 रक्तदान शिबिरात 6000 हून अधिक दात्यांनी रक्तदान करुन गरजूंची केली मदत
सोलापूर : जमीयत ए अहले हदिस यांच्यावतीने अतहर ब्लड बँकेच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात सुमारे 250 हून अधिक रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केलं. आजवर झालेल्या 27 रक्तदान शिबिरात 6000 हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करुन गरजूंची मदत केलीय.
पवित्र कुराणमध्ये सुरह नंबर: ५ आयात नंबर : ३२ मध्ये अल्लाहने सर्व मानवजातीला मार्गदर्शन करताना म्हटले आहे की : "ज्याने कोणाला जीवनदान दिले, त्याने जणू काही सर्व मानवजातीला जीवन प्रदान केले." हीच शिकवण लक्षात ठेवून सोलापुरात जमीयत ए अहले हदिस यांच्यावतीने दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.
यंदाच्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन सोलापूर जमीअत अहले हदीसचे अध्यक्ष मुख्तार हुमनाबादकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी संस्थेचे सचिव मौलाना ताहेर बेग, खजिनदार अब्दुल हमीद शेख, अतहर ब्लड बँकेचे प्रमुख अस्लम हमदुले, सामाजिक कार्यकर्ते वसीम शेख यांच्यासह अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
मानवी आरोग्याचे महत्व जाणून हल्ली रक्ताचा होणारा तुटवडा लक्षात घेत सर्वसामान्य गरजू रुग्णांना वेळेवर रक्त पुरवठा व्हावा, या उद्देशाने जिलाई जमीअत अहले हदीस, सोलापूर व अतहर ब्लड बँक यांच्यावतीने प्रत्येक वर्षी तीन ते चार रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.
रविवारी, 08 डिसेंबर रोजी सोशल उर्दू हायस्कूल या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले हे 27 वं रक्तदान शिबीर होते. आतापर्यंत झालेल्या शिबिरात सुमारे 6 हजारहून अधिक दात्यांनी 'रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान' ही संकल्पना सत्यात आणून दाखवली. यावेळी जमीयत ए अहले हदीस संस्थेचे सचिव मौलाना ताहेर बेग मोहम्मदी यांनी रक्तदान केलेल्या नागरिकांचं आभार व्यक्त केले.