सोलापूर : शेतात पाणी देत असलेल्या शेतकऱ्यास बोलावून 'तू खालच्या जातीचा,... ' अशी जातीवाचक शिवीगाळी करीत लोखंडी सळईने जबर मारहाण करण्यात आलीय. ही घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील देगाव शिवारात ०६ डिसेंबर रोजी दुपारी घडलीय. कुमार महादेव कट्टीमनी (वय-४३ वर्षे) असं जखमी शेतकऱ्याचं नांव आहे. जखमीच्या फिर्यादीनुसार सलगर पोलिसांनी आकाश पडसाळकर यांच्यासह तिघाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, विजापूर रस्त्यावरील आरटीओ कार्यालय नजीकच्या समता नगरातील रहिवासी कुमार कट्टीमनी याची देगाव शिवारात शेतजमीन आहे. शेतातील विकास पाणी देत असताना, आकाश पडसाळकर व इतरांनी त्यास बांधावर बोलावून, 'तू आमचा रस्ता का बंद केला आहे, तुझी औकात काय, तुझा बोअर आमच्या शेत जमिनीत आहे, असा वाद घालत जातीवाचक शिवीगाळी केली.
यावेळी त्यास हातातील लोखंडी सळईने जबर मारहाण केली. तो खाली पडल्यावर मदतीसाठी ओरडत असताना त्याच्या खिशातील मोबाईल काढून घेऊन फोडून टाकून ते घटनास्थळावरून निघून गेले.
याप्रकरणी कुमार कट्टीमनी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार सलगर वस्ती पोलिसांनी आकाश पडसाळकर, युवराज पडसाळकर आणि आकाशची आई नाव माहित नाही (सर्व रा. पडसाळकर वस्ती, गणेश नगर तांडाजवळ देगांव) या आरोपीविरुद्ध भा.न्या. सं. क ११८(२), ३५२,३२४(४),३(५) मपोका ३७ (१), १३५ सह अ.जा.अ.ज अत्या. प्रति काक ३ (१) (४), (एस) ३ (२) (वी) प्रमाणे गुन्हा दाखल केलाय. सहाय्यक पोलीस आयुक्त (विभाग-२) गवारी या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.