Type Here to Get Search Results !

... एक तास तरी मैदानावर खेळले पाहिजे : अध्यक्ष संजीव बिद्री

सहस्त्रार्जुन प्रशालेत क्रीडा महोत्सवाचं श्रावणी सूर्यवंशी यांच्या हस्ते उद्घाटन 

सोलापूर : मैदानी खेळामुळे आपलं शरीर तंदरुस्त राहतं, शारीरिक व मानसिक बळ वृध्दिंगत होण्यासाठी युवाशक्तीनं मैदानी खेळ आणि स्पर्धांमध्ये सहभागी होऊन मैदान गाजवावं. प्रत्येकाने नियमीत एक तास तरी मैदानावर खेळले पाहिजे, असं प्रतिपादन सो.स. क्षत्रिय समाज विठ्ठल मंदिर ट्रस्ट, सोलापूरचे अध्यक्ष संजीव बिद्री यांनी केले.

येथील सहस्त्रार्जुन प्रशालेत डिसेंबर महिन्यात क्रीडा स्पर्धा घेण्यात येतात. त्यामध्ये अंतर्वर्गीय सामने खेळले जातात. यामध्ये कबड्डी, खो-खो, लिगोरी, संगीत खुर्ची, लिंबू-चमचा, गोळा फेक, स्लो सायकल, शंभर मीटर धावणे, बुद्धिबळ, क्रिकेट असे सर्व प्रकारचे खेळ घेतले जातात. प्रशालेतील विद्यार्थी अभिरुचीप्रमाणे या खेळांमध्ये हिरीरीने सहभागी घेतात.

शहस्त्रार्जुन प्रशालेत आयोजित क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन भारतीय खेळाडू इंटरनॅशनल डाईव्हरपटू कुमारी श्रावणी प्रताप सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले. यावेळी क्रीडाभारती, सोलापूरचे सचिव राजेश कळमणकर प्रमुख पाहुणे तर संस्थेचे सचिव जयकुमार कोल्हापुरे व सदस्य भरतकुमार शालगर, सहस्त्रार्जून शैक्षणिक संस्थेचे सचिव गजाननसा गोयल यांची प्रमुख उपस्थिती होती. संजीव बिद्री कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

ही प्रशाला हॉकीचे एक शक्तिपीठ आहे, असे उल्लेख करून क्रीडाभारती, सोलापूरचे सचिव राजेश कळमणकर यांनी हॉकी खेळाडूंचे कौतुक करून प्रशालेने हॉकी खेळात मिळवलेल्या यशाबद्दल शाळेचे कौतुक केले. त्याचबरोबर बदलत्या जीवनशैलीत खेळ किती महत्त्वाचे आहे. त्याबद्दलही राजेश कळमणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

खेळामुळे आपल्या शरीराचा सर्वांगिण विकास होतो, प्रत्येकाने एखादा खेळ छंद म्हणून जोपासावा, असं आवाहन सहस्त्रार्जून शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजूसा भूमकर यांनी समारोपात केले.

अभ्यास आणि खेळावर लक्ष केंद्रीत करून विद्यार्थ्यांनी  स्वतःला मोबाईलपासून दूर लांब ठेवले पाहिजे, असं आवाहन सो.स. क्षत्रिय समाज विठ्ठल मंदिर ट्रस्ट, सोलापूरचे अध्यक्ष संजीव बिद्री यांनी अध्यक्षीय मार्गदर्शनपर भाषणात केले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक भगवंत उमदीकर यांनी केले. क्रीडा शपथ इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कुमारी शिवांजली रुपेश होदडे हिने केले.

यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक भगवंत उमदीकर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. मंजुषा काशीद, इंग्लिश मीडियमचे विभागाचे मुख्याध्यापक डॉ. विष्णू रंगरेज हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मनीषा काळे यांनी केले, तर प्रशालेचे क्रीडा शिक्षक डॉ. उज्वल मलजी यांनी सर्व उपस्थितांचं आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकुलातील सर्व शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचारी खूप परिश्रम घेतले.

.... चौकट ....

... पुढचा ध्येय ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल : श्रावणी सूर्यवंशी

या स्पर्धेचे उद्घाटन भारतीय खेळाडू इंटरनॅशनल डाईव्हर कुमारी श्रावणी प्रताप सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले. नुकत्याच फिलिपिन येथे पार पडलेल्या डायव्हिंग स्पर्धेमध्ये भारताकडून खेळताना कुमारी श्रावणी सूर्यवंशी हिनं उत्कृष्ट कामगिरी करून गोल्ड मेडल प्राप्त केलंय. 

त्यांनी मनोगतामध्ये त्यांचा प्रवास कसा सुरुवात झाला, त्यांचे कोच श्रीकांत शेटे सरांनी त्यांना कशा प्रकारे तयार केलं, याबद्दल त्यांनी माहिती सांगितली. पुढचा ध्येय ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल मिळण्याचा आहे, हे सुद्धा त्यांनी नमूद केलं. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी श्रावणीला विविध प्रश्न विचारले, श्रावणीने त्या प्रश्नांना समाधानकारक अशी उत्तरेही दिली.