सोलापूर : कर्नाटकातील बिदर येथे 12 व्या शतकातील संतश्रेष्ठ बुरुड केतेश्वर महाराजांची समाधी आहे, त्या समाधीस्थळावर बसविण्यात येणाऱ्या पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण रविवारी, 29 डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती निमंत्रक दशरथ वडतिले यांनी दिली.
त्यादिवशी तेथे दिवसभर भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. सकाळी नऊ वाजता ओल्ड सिटी, बुरुड गल्ली येथून संत बुरुड केतेश्वर महाराजांच्या पुतळ्यासह भव्य सवाद्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. दुपारी बारा वाजता समाधीस्थळ असलेल्या चिद्री येथे पूजाविधी व महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. तेथेच दुपारी 3 वाजता सभागृहात मुख्य कार्यक्रम होईल.
या कार्यक्रमास चित्रदुर्ग येथील मठाधिपती इम्मडी बसव केतेश्वर महाराज,भालकीच्या हिरेमठ संस्थानचे प्रमुख डॉ. बसव पट्टदेवरु, कर्नाटकचे मंत्री वनमंत्री ईश्वर खंड्रे, शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे, आ. हरीश पिंपळे व आ. किशोर जोरगेवार तसेच अनेक राज्यातील बुरुड समाजाचे नेते, महाराज, आमदार, खासदार व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, असं दशरथ वडतिले यांनी सांगितले.
चित्रदुर्ग मठाचे उपाध्यक्ष डॉ. संजीवकुमार नागेश्वर, इंजिनियर सुरेश मेदा व बिदर बुरुड समाजाचे अध्यक्ष राजकुमार नागेश्वर यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु आहे. या कार्यक्रमास बुरुड समाज बांधवांनी व केतेश्वरप्रेमींनी उपस्थित राहावं, असं आवाहन संयोजन समितीनं केलं आहे.