Type Here to Get Search Results !

जलशक्ती अभियान : केंद्रीय पथकाने घेतला आढावा

सोलापूर : केंद्रपुरस्कृत ‘जलशक्ती अभियान: 'कॅच द रेन’ अंतर्गत विविध विभागाद्वारे करण्यात आलेल्या कामांचा आढावा आज केंद्रीय पथकाने घेतला. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेऊन सादरीकरणही करण्यात आले.

जलशक्ती अभियानः ' कॅच दी रेन ' या अभियानाचा आढावा केंद्रीय नोडल अधिकारी राकेश कुमार मीना,  केंद्रीय अधिकारी श्रीमती एकता धवण या दोन सदस्यांच्या पथकाने जिल्ह्यातील विविध विभागाद्वारे जलशक्ती अभियानांतर्गत केलेल्या कामाचा आढावा घेतला. 

या बैठकीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्यकार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा मृद व जलसंधारण दयासागर दामा, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा अधिकारी एम.जे. शेख, जिल्हा जलसंधारण अधिकारी एस. एस. पारसे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारणचे क्षीरसागर, जिल्हा सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शेगर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता चौधरी, उपअभियंता व जनसंपर्क अधिकारी लाभ क्षेत्रचे श्रीमती व्हि.बी. कोरे. भीमा विकास विभागाचे कार्यकारी अभियंता एस. माने तसेच संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय पथकाने  जिल्ह्यातील जलशक्ती अभियानातील कामांबाबत समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील कामगिरी चांगली असल्याचे सांगून त्यांनी जिल्ह्यात काही उपाययोजना राबविण्यावर भर द्यावा, अशी सूचना केली. त्यात प्रामुख्याने पावसाच्या पाण्याचे जलपुनर्भरण, जलपुनर्भरणाच्या विविध उपायांचा अवलंब करणे, रिचार्ज शाफ्ट सारख्या उपाययोजना आणखी वाढवणे, भुजल अधिनियमाचे काटेकोर पालन करणे. तसेच सोलापूर महानगरपालिकामार्फत नारी शक्ती से जलशक्ती अभियान व  शिक्षण विभागातील शाळांनी जलशक्ती अभियानाची जागरूकता विषय कार्यक्रम घ्यावेत, अशा सूचनाही यावेळी केल्या.

जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा यांनी जिल्ह्यातील जलशक्ती अभियानांतर्गत नारीशक्ती ते जलशक्ती हे ब्रीद अंतर्गत  जलसंधारणाची कामे, अमृत सरोवर योजना, रेन हार्वेस्टिंग, नाला खोलीकरण रुंदीकरण बंधारे या कामांची माहिती दिली. 

तसेच भूजल सर्वेक्षण यंत्रणा अधिकारी शेख यांनी या विभागामार्फत केलेल्या कामाचा आढावा दिल्यानंतर राकेश कुमार मीना यांनी मागील बैठकीनंतर पाच महिन्यात हे काम समाधानकारक असून 1.5 मीटर पाणी पातळी अवरेज वाढल्याचे समाधान व्यक्त केले.

यावेळी ऑगस्ट 24 मध्ये झालेल्या जलशक्ती अभियानाच्या बैठकीतील सूचनांचा आढावा घेण्यात आला. त्याचबरोबर जलसंचय जन भागीदारी चा आढावा घेण्यात आला .तसेच अमृत सरोवर योजनेच्या  कामावर विशेष भर द्यावा, अशा सूचनाही या बैठकीत करण्यात आल्या.