Type Here to Get Search Results !

'... मुंह दिखाने को जगाह नही रहेगी, और पुलीस भी तेरे पिछे पडेगी'; लाखोंच्या फसवणुकीनंतर धमकी


सोलापूर :  '...मुंह दिखाने को जगाह नही रहेगी, और पुलीस भी तेरे पिछे पडेगी'; अशी धमकी जादा परताव्याच्या अपेक्षेने बिटकॉईनमध्ये गुंतवणुक केलेल्या गुंतवणूकदारास देण्यात आलीय. हा प्रकार नोव्हेंबर २०२२ ते मार्च २०२४ दरम्यान घडलाय. याप्रकरणात फसलेल्या प्रविणकुमार अकिम (वय-३४ वर्षे) याच्या तक्रारीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात विवेक बालकृष्ण मिश्रा याच्याविरुध्द गुन्हा दाखल झालाय.

याबाबत मिळालेले अधिक माहिती अशी की, विडी घरकुल, एफ ग्रुपमधील रहिवासी प्रविणकुमार सुरेश अकिम हा 'विवेक गोल्डन' या यु ट्युबवर विवेक मिश्रा याचे व्हिडीओ पाहत असताना विवेक मिश्रा याचा मोबाईल क्रमांक प्राप्त करुन भ्रमणध्वनीवर बोलणे झाले.

त्यानंतर विवेक मिश्रा याने प्रविणकुमारला वेळोवेळी फोन करुन जादा परताव्याच्या अपेक्षेने बिटकॉईनमध्ये गुंतवणुक करण्यास तसेच दुप्पट परतावा देण्याची थाप मारून जादा परतावा व रक्कम दुप्पट होणार असल्याबाबत प्रविणकुमार ला व्हिडिओ पाठवू लागला. ते व्हिडीओ पाहून व विवेकच्या बोलण्यावर विश्वास ठेवून प्रविणकुमारने वेळोवेळी गुगल पे, फोन व्दारे ०४ लाख ०५ हजार रुपयांची गुंतवणूक केली.

त्यानंतर प्रविणकुमारने गुंतवलेल्या रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी परस्पर वापर करुन घेऊन त्यास अद्यापपर्यंत त्याची रक्कम वा कुठलाही परतावा दिला नाही. विवेकचे दुसरे मोबाईल क्रमांक मिळवून त्यास संपर्क केला असता, तो 'तुला ओळखत नाही, कसले पैसे, हमारे से पंगा मत लो' अशी धमकी दिली.

त्याने तेवढ्यावरच न थांबता, 'नही तो तेरा मोबाईल हॅक करके, तेरा व्हिडीओ बनाके बदनामी करेंगे और तुझे कही मुंह दिखाने को जगाह नही रहेगी और पुलीस भी तेरे पिछे पडेगी अशी धमकी दिली.

या धमकीला घाबरुन प्रविणकुमारनं एमआयडीसी पोलिसांकडं धाव घेतलीय. त्याच्या फिर्यादीनुसार विवेक बालकृष्ण मिश्रा (रा. माहित नाही) याच्याविरुध्द भादवि ४२०,४०६,५०४, आय टी अॅक्ट ६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस निरीक्षक खोमणे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.