सोलापूर : वाहतुक केसची दंडाची रक्कम भरणा करण्यासंबंधी यापूर्वीच समन्स पाठविण्यात आलेत, त्यांनी दंडाची रक्कम भरलेली नाही, त्यांच्यावर आता न्यायालयानं वॉरंट काढले आहेत. अशा वॉरंट निघालेल्या नागरिकांनी वाहतूक केसची कायदेशीर दंडाची रक्कम भरणा करुन स्वतःवरील अटकेची कायदेशीर कारवाई टाळावी, असं आवाहन सोलापूर पोलीस आयुक्तालयातील (मानव संसाधन विकास)वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी केलं आहे.
येथील जिल्हा न्यायालय यांच्याकडून पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहरकडे यापूर्वी वाहतूक केसेस संदर्भात समन्स प्राप्त झाले होते. त्या समन्सची बजावणी करुनही जे न्यायालयात हजर झाले नाहीत अगर दंडाची रक्कम भरणा केली नाही, अशांवर जिल्हा न्यायालयाने यांनी वॉरंट काढले आहेत.
सोलापूर शहर हद्दीतील ३५० वाहतूक केसेसचे वॉरंट पोलीस आयुक्तालयाकडे प्राप्त झाले आहेत. पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर अंतर्गत पोलीस ठाण्याकडून एकूण ३५० वॉरंट बजावणीसंबंधी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.
बुधवारी, २७ नोव्हेंबर रोजी पोलीस आयुक्तालयाकडून १३ वॉरंटची बजावणी करण्यात आलीय. त्याप्रमाणे त्या १३ जणांनी वाहतूक केसेसच्या कायदेशीर दंडाची भरणा करुन जिल्हा न्यायालय येथून वॉरंट रद्द करुन घेतले आहेत,असंही वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी म्हटलंय.
तरी उर्वरित वॉरंट प्राप्त इसमांनी आपलेवरील वाहतुक केसची दंडाची रक्कम भरणा करुन जिल्हा न्यायालय, सोलापूर येथून वॉरंट रद्द करुन घ्यावे, जेणेकरुन आली गैरसोय होणार नाही, अन्यथा आपल्या वाहतूक केसमधील वॉरंटमध्ये कायदेशीर अटकेची कारवाई केली जाईल, असंही वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी सांगितलंय.