बुधवारी, 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. सर्व राजकीय पक्ष मतदान करण्याचे आवाहन करत आहेत, परंतु काही लोक म्हणत असतात की, "माझ्या एका मताने काय फरक पडणार आहे?" पण एक मत किती महत्त्वाचे असते, याची काही उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
२०१६ साली पैठण नगरपालिकाच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये संगीता मापारी या नगरसेविका फक्त एका मताने विजयी झाल्या होत्या. राजस्थानातील सी.पी. जोशी जे मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत होते, ते २००८ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये केवळ एका मताने पराभूत झाले होते. त्यांना ६२,२१५ मते मिळाली होती, तर त्यांचे प्रतिस्पर्धी यांना ६२,२१६ मते मिळाली होती. विशेषतः त्यावेळेस त्यांची आई, पत्नी आणि ड्रायव्हर यांनी मतदान केले नव्हते.
१९९९ साली अनेक पक्षांच्या पाठिंब्याने अटलबिहारी वाजपेयी सरकार आले. त्यावेळेस त्यांच्या सरकार विरुद्ध अविश्वासाचा ठराव आला. त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार केवळ एका मताने पडले.
अमेरिकेची राजभाषा जर्मन असावी की इंग्रजी असावी, याबाबत १७९५ साली अमेरिकेमध्ये वाद निर्माण झाला. याचा निर्णय मतदानाने घेण्याचा ठरले. त्यावेळेस केवळ एका मताने इंग्रजी राजभाषा निश्चित झाली व जर्मन भाषेचा केवळ एका मताने पराभव झाला. एका मताने अमेरिकेची राजभाषा इंग्रजी झाली. इतके महत्व आहे, एका मताला!
लोकशाहीमध्ये प्रत्येक मताला महत्त्व असते. एक एक मत मिळूनच लोकशाहीमध्ये आपण आपला प्रतिनिधी निवडत असतो. एक मत नाही दिले तर काय होऊ शकते, याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपला मताचा अधिकार बुधवारी, २० नोव्हेंबर रोजी बजावावा, ही विनंती.
- डॉ. श्रीमंत कोकाटे.