सोलापूर : शहरातील फौजदार चावडी व एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार अर्जुन सिद्राम सलगर (वय ४५ वर्षे, रा. शिवाजी नगर, बाळे) याच्या गुन्हेगारी कृत्यास आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी स्थानबध्दतेचे आदेश निर्गमीत करून गुरुवारी, ३१ ऑक्टोबर रोजी त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आलीय.
अर्जुन सलगर हा मागील काही वर्षापासून सातत्याने इच्छापूर्वक दुखापत करणे, जबरी चोरी करणे, खंडणी मागणे, आगळकी करणे, कट रचणे, जागा बळकावणे, चोरी करणे, विनयभंग करणे, धाकदपटशा करणे, गैरकायद्याची मंडळी जमविणे, घातक शस्त्रांनी धमकवणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे.
त्याच्याविरुध्द सोलापूर पोलीस आयुक्तालयात एकुण १४ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापुर शहरातील नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन, सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे. अर्जुन सलगर याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे, त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्याविरुध्द सामान्य नागरीक उघडपणे पोलीसांना माहीती देत नाहीत, असं पोलिसांचं म्हणणे आहे.
अर्जुन सिद्राम सलगर याला त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन २०११ मध्ये क. ११० (ई) (ग) फौ.प्र.सं अधिनियमानुसार व क.३ एमपीडीए कायदयान्वये प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या.
त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही. त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल, अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य त्याच्या साथीदारांच्या मदतीने संघटीतपणे चालू ठेवली. त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी ३१ ऑक्टोबर रोजी त्याच्याविरुध्द स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित करुन, त्याची रवानगी येरवडा कारागृह, पुणे येथे करण्यात आलीय.