सोलापूर/प्रतिनिधी : विश्वाच्या कल्याणासाठी पूर्णयोग हा महत्वाचा आहे, असं प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिपावली पूर्ण विवेकाची अमृतवाणीच्या पहिल्या दिवशीचे पुष्प गुंफताना पूर्णयोगचे महत्व त्यांनी विषद केले.
मन, शरीर आणि प्राण हे शुध्द ठेवता आले पाहिजे. त्यातूनच परिवर्तन होते. सदिच्छा आणि आनंद वृत्ती असली पाहिजे. पूर्णयोगातून मानवी जीवन सुखकर आणि आनंददायी होते, असेही निरूपणकार विवेक घळसासी यांनी सांगितले.
प्रारंभी मसाप दक्षिण शाखेचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी प्रास्ताविक केले, त्यानंतर जितेंद्र महामुनी यांनी शंखनाद करताना निरूपणकार विवेक घळसासी यांचे मंचावर आगमन झाले. आर्यन क्रिएशनचे विनायक होटकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून घळसासी यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर निरूपणाला सुरूवात झाली. पहिल्या दिवशी पूर्णयोग यावर निरूपण झाले.
सकाळी 6 वाजून 25 मिनिटांनी सुरू झालेल्या या निरूपणाला रसिक श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी मसापचे जितेश कुलकर्णी यांच्यासह शहर परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते तर पंढरपूर, मंगळवेढाहून काही श्रोते सकाळीच या कार्यक्रमाला हजेरी लावलेले होते. शनिवारी, 26 ऑक्टोबर रोजी पूर्णयोग-अंतरंग साधना यावर निरूपण होणार आहे.