सोलापूर : राज्यातील सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्यापर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली न निघाल्याने आरक्षणाच्या मागणीवर आग्रही असलेल्या मराठा बांधवांनी आपल्या भावनांना कासेगांवातून वाट मोकळी करून दिलीय. गुरुवारी सायंकाळी अक्कलकोट विधानसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार तथा विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना कासेगांव इथं मराठा समाजाच्या असंतोषाला सामोरं लागल्याचं दिसून आलंय.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव जिल्ह्याच्या सीमावर्ती गावांपैकी एक गांव ओळखलं जातं. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा झाल्यावर विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी ग्रामस्थांशी साधण्यासाठी गुरुवारी सायंकाळी कासेगावात आले होते. गांवचे सरपंच यशपाल वाडकर आणि भाजप समर्थकांनी त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करून राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोबोशाह वली कट्टयावर सभेचं आयोजन केलं होतं. पंचक्रोशीतील कल्याणशेट्टी समर्थकांनी यावेळी गर्दी केली होती.
सायंकाळी आमदार आले, त्यांच्या पक्ष समर्थकांनी त्यांचं स्वागत करण्यापूर्वी गांवच्या वेशीजवळ मारूती मंदिरासमोर जमलेल्या मराठा समाज बांधवांनी, 'एक मराठा, लाख मराठा', 'जय जिजाऊ, जय शिवराय', 'आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं' अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. त्यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी, मराठा समाज बांधवांसमोर, त्यांची मराठा आरक्षणासंबंधी भूमिका विशद करताना, मराठा आरक्षणासंबंधी आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल त्यांच्यावर २ गुन्हे असल्याचे सांगितले.
त्यावेळी आरक्षण प्रश्नावर बोलताना, मराठा समाज बांधव, आपण मराठा आरक्षण समर्थनासाठी फेसबुकवर शेअर केलेली एखादी पोस्ट दाखवा, म्हणून हट्ट धरू लागले. ते मराठा समाज बांधवांचं समाधान करू शकले नसावेत, असे दिसले. त्यानंतर घोषणा वाढतच गेल्या. ते त्यावेळी गर्दीतून वाट काढत समर्थकांसमवेत सभास्थळाकडे गेले.
सभास्थळी, त्याचं स्वागत होऊन कोट्यावधी रुपयांच्या निधी खर्चाच्या विकास कार्याचा पाढा वाचला जात होता. त्याचवेळी आमदार कल्याणशेट्टींचं आगमन झालं. ते बोलण्यास उभे राहिले, त्यावेळी '... लढेंगे, हम सब जरांगे' च्या घोषणा सुरु झाल्या. त्यावेळी आमदार कल्याणशेट्टी यांनी केलेल्या विकास कार्याची उजळणी करून भाजपाचा विकासात्मक दृष्टीकोन विस्तृतपणे मांडण्यापूर्वीच भाषणाची इतिश्री केली. ते सभास्थळावरून उतरून थेट वाहनात बसले, त्यांनी परतीचा प्रवास सुरु करणे पसंद केले. त्यांना 'एक मराठा, लाख मराठा' घोषणातच मराठा समाज बांधवांनी निरोप दिल्याचे दिसून आले.
.... चौकट ....
सत्ताधारी 'जात्यात' तर विरोधक 'सुपात'
आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा समाजाचा असलेला आग्रह विचारात घेता, विद्यमान सरकारने मराठा आरक्षणावर ठोस भूमिका घेतली नाही. मराठा समाजाच्या मनात असलेली खदखद आमदार कल्याणशेट्टी यांच्या सभेच्या निमित्तानं कासेगांवात व्यक्त झालीय. आज सत्ताधारी 'जात्यात' तर विरोधक 'सुपात' आहेत. आज जनरोषाच्या चक्कीत कोणी भरडला गेला तर पुढच्या मुठीत विरोधी पक्षही असणार आहे. सत्ताधारी आणि विरोधकांना आरक्षणासंबंधी आपल्या भूमिकेचा अभ्यास करून मैदान गाजवावं लागणार , हे मात्र नक्की !