Type Here to Get Search Results !

सोलापूर महानगरपालिका आणि ज्येष्ठ नागरिक संघ संयुक्त विद्यमाने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन थाटात साजरा


सोलापूर: वर्ष २०१३ पासून सालाबादप्रमाणे यंदाही जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या औचित्याने सोलापूर महानगरपालिका आणि सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघाच्या संयुक्त विद्यमाने आनंदमेळा आणि गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.

यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते आणि सोलापूर महानगरपालिकेच्या उपायुक्त ज्योती भारती पाटील यांच्या उपस्थितीत उद्योगपती रंगनाथ बंग, आदर्श शिक्षक आप्पासाहेब कनाळे यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

पं. आनंद बदामीकर, सोलापूर विकास मंचचे केतन शहा यांना सोलापूररत्न पुरस्काराने, कवी देवेंद्र औटी यांना कवीरत्न पुरस्काराने आणि पत्रकार अरुण बारसकर यांना लोकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

त्याचबरोबर महापालिकेतील सेवाव्रतींचाही यथोचित गौरव करण्यात आला. त्यात आदर्श सेविका- चंद्रकला कांबळे, गुणवंत कर्मचारी-मल्लेश नराल,  कर्तव्यदक्ष अधिकारी- स्नेहल चपळगांवकर यांचा समावेश आहे.

सोलापुरातील विविध ज्येष्ठ नागरिक मंडळांच्या माध्यमातून भरीव कामगिरी पार पाडणाऱ्या विविध संघटनांच्या अध्यक्षांचा 'समाज रत्न पुरस्कार' देऊन सत्कार करण्यात आला. जगन्नाथ पाटील, नागनाथ अधटराव, अरुण वाघमोडे, विजय सहस्रबुद्धे, प्रा. विलास मोरे, अशोक ठोंबरे पाटील, मन्मथ कोनापुरे, सिद्राम संके, अरुण कदम, चेन्नय्या स्वामी, विजयकुमार काटवे, विजयकुमार भोसले, बाबुराव नरोणे, नागेश कुंभार, शंकर बटगेरी, एम. बी. काळे, सिद्रामप्पा हुंडेकर, नागनाथ कदम, श्रीमती जयश्री जागीरदार, डॉ. सरिता कोठाडिया त्याचे मानकरी ठरले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. स्वागतपर भाषण संघाचे अध्यक्ष घनश्याम दायमा यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात सोलापूर ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीचे अध्यक्ष गुरुलिंग कन्नूरकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनाची पार्श्वभूमी आणि ज्येष्ठ नागरिक दिनाचे महत्त्व विशद केली.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ज्येष्ठ नागरिक अर्थक्रांती जीवनगौरव अभियानचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय देशमुख दबडगावकर यांनी ज्येष्ठांच्या समस्या व त्यांच्या निराकरणासाठी तयार केलेला अभ्यासपूर्ण अहवाल राष्ट्रपती द्रोपदी मुरमु यांच्यापर्यंत पोहोचवल्याची माहिती देत ज्येष्ठांच्या व्यापक एकजुटीची हाक दिली.

कार्यक्रमाचे संचलन वाडकर यांनी केले, तर संजय जोगीपेठकर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.