सोलापूर : पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरोडा टाकण्याच्या तयारीत निघालेली परप्रांतीय टोळी गजाआड झालीय. हा खळबळजनक प्रकार होटगी रस्त्यावरील हत्तुरे वस्ती ते पत्रकार भवन दरम्यान गुरुवारी दुपारी घडलाय. या संशयित टोळीच्या ताब्यातून एका चार चाकी वाहनासह तेरा लाख रुपयांहून अधिक किमतीचा हस्तगत करण्यात आलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, गुरुवारी दुपारी वरील नमूद रस्त्यावर पोलिसांनी एमएच १२ टीडी २२३८ क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या संशयित एर्टीगा कारचा पाटलाग करून, त्या वाहनाची झाडाझडती केली. या तपासणीत हाती लागलेल्या साहित्यावरून त्या कारमधील टोळी दरोडा घालण्याच्या तयारीत निघाली होती, असा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.
त्यांच्या ताब्यातून तीन लहान-मोठे कटर, केसरी कुऱ्हाड, निळा एक्सा ब्लेड, कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, इलेक्ट्रिक कटर मशिन, लोखंडी हातोडी, काळे ६ कापडी मास्क व पांढरी एर्टिगा कार एकूण १३,०३,८०० रूपयांचं साहित्य जप्त करण्यात आलंय.
याप्रकरणी पोकॉ/८५९ अमृत सुरवसे यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. विशाल कृष्णप्पा बंडीवडार (रा. हनगल जि. हावेरी रा- कर्नाटक), अनिल शिवप्पा वड्डर (रा- सदर), प्रशांत ऊर्फ परश्या, कृष्णा ऊर्फ कृष्णप्पा बंडीवडार, प्रविण आणि अनंत (रा-चिनहळ्ळी, कर्नाटक) अशी संशयित दरोडेखोरांची नांवे आहेत.
सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.