अभिजीत कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्सेसचा वार्षिक अहवाल प्रकाशित
सोलापूर : सोलापूरला पुन्हा गतवैभव मिळवून देण्याची जबाबदारी ही सोलापुरातील प्रत्येक नागरिकांची आहे. त्यासाठी भारती विद्यापीठाने योगदान देणे, महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन प्रमुख पाहुणे येस न्यूजचे संपादक शिवाजी सुरवसे यांनी केले.
प्रारंभी इन्स्टिट्यूट चे संचालक प्रा. डॉ. एस. बी. सावंत यांनी प्रमुख पाहुणे शिवाजी सुरवसे यांचं स्वागत केले. त्यानंतर त्यांनी आपल्या स्वागतपर भाषणात इन्स्टिट्यूटमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच भारती विद्यापीठाचा चढता आलेख उपस्थितांपुढं मांडला.
भारती विद्यापीठ हे एक जागतिक दर्जाची संस्था असून भारती विद्यापीठाच्या माध्यमातून बाहेर पडणारे विद्यार्थी हे भारतातच नाही तर भारताबाहेरही मोठ्या पदावर कार्यरत असल्याचे गौरवोद्गार शिवाजी सुरवसे यांनी काढले.
यावेळी बोलताना ते पुढं म्हणाले, सोलापुरात लवकरच विमानसेवा सुरू होईल, त्याचा उद्योग वाढीसाठी नक्कीच फायदा होईल. सोलापुरातील प्रस्तावित आयटी पार्क तसेच नवीन येणाऱ्या इंडस्ट्रीज यामुळे सोलापुरातील विद्यार्थ्यांना सोलापुरातच चांगली नोकरी मिळेल, सोलापूरची आर्थिक प्रगती होईल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
हा वार्षिक अहवाल करण्यासाठी डॉ. राहुल मांजरे तसेच तेजस्विनी राठोड, चेतन लामानी आणि रीहान शेख या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. पी. पी. कोठारी यांनी केले तर आभार प्रदर्शन एमबीए विभाग प्रमुख प्रा. सी. आर. सूर्यवंशी यांनी मानले. याप्रसंगी एमसीए विभाग प्रमुख डॉ. एम के पाटील व इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.