Type Here to Get Search Results !

ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेची लक्षवेधी कामगिरी; चोरट्याकडून ११.५५ लाखाचा मुद्देमाल हस्तगत


सोलापूर : माळशिरस येथील दरोडा आणि घरफोडीच्या अनेक गुन्ह्यात 'वांटेड' असलेल्या सराईत गुन्हेगारास गजाआड करण्याची लक्षवेधी कामगिरी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेनं केलीय. देवगन बापु उर्फ विजय पवार (रा. आटपाडी) असं त्याचं नांव असून त्याच्या ताब्यातून दरोडा आणि नातेपुते घरफोडीच्या गुन्ह्यातील १७ तोळे वजनाचे सोन्याच्या दागिण्यांसह ११.५५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेने एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिलीय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,माळशिरस तालुका धर्मपुरी केंजळे वस्ती येथे ९ ऑगस्ट २०२३ रोजी पहाटे चोरट्यांनी सुभाष नरहरी केंजळे यांच्या राहत्या घराचे कुलुप तोडून घरातील ४ लोखंडी पत्र्याच्या पेट्या घराबाहेर घेऊन जाऊन १,४५,००० रूपयांची रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा एकुण ४,५४,००० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी सुभाष नरहरी केंजळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भादविसंक ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.


पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे मालाविषयी गुन्ह्यासंदर्भात आढावा बैठक घेतली. बैठकीत जिल्ह्यातील घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत तसेच जिल्ह्यातील पाहिजे फरारी आरोपींचा शोध घेण्यासंबंधी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना सूचना दिल्या.


त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी सपोनि नागनाथ खुणे व त्यांच्या पथकास घरफोडी चोरीचे गुन्हे व पाहिजे फरारी आरोपींचा शोध घेण्याकामी आदेशीत केले होते.

सहा.पोलीस निरीक्षक, नागनाथ खुणे व त्यांच्या पथक सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील फरारी आरोपींचा शोध घेण्यासाठी अकलूज शहरात हजर होते, सपोनि नागनाथ खुणे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार नातेपुते पोलीस ठाण्याकडील भादविसंक ४५७, ३८० प्रमाणे दाखल गुन्हा हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार देवगन बापु उर्फ विजय पवार (रा. आटपाडी) याने त्याच्या अन्य साथीदारांसमवेत केला असून तो सध्या अकलूज शहरातील गांधी चौक येथे नातेपुतेकडे जाण्याकरीता थांबला असल्याचे माहिती मिळाली.

त्यावेळी सहा. पोलीस निरीक्षक, नागनाथ खुणे व त्यांच्या पथकाने त्या ठिकाणी जावुन सापळा रचुन त्यास ताब्यात घेतले. त्याचेकडे गुन्ह्यांच्या अनुषंगाने चौकशी केली असता, त्याने त्याच्या इतर साथिदारांसह मिळून मागील एक वर्षापूर्वी नातेपुते हद्दीतील धर्मपुरी येथे केलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिलीय.


त्यानंतर या आरोपीकडं कौशल्यपूर्ण तपास केला असता, त्याने व त्याच्या अन्य साथीदारासोबत माळशिरस येथे आणखी ०२ घरफोडी चोरीचे गुन्हे केल्याचीही कबुली दिली. त्याने गुन्ह्यातील चोरलेले १७ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने असा ११,५५,००० रूपये किंमतीचा मुद्देमाल फोंडशिरस येथील त्याच्या सासऱ्याच्या घरातून हस्तगत केला. हा गुन्हा उघडकीस आणून गुन्ह्यातील दागिने हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि नागनाथ खुणे व त्यांच्या पथकास यश प्राप्त झालंय.


ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांचे नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुणे, सपोनि महारूद्र प्रजणे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, सफौ नारायण गोलेकर, विजय पावले, महिला पोह मोहिनी भोगे, पोह धनाजी गाडे, सलीम बागवान, मोहन मनसावाले, अक्षय दळवी, सागर ढोरे पाटील, अक्षय डोंगरे, चालक पोना समीर शेख यांनी बजावली.