लाचखोर अधिकाऱ्याच्या सरकारी वाहनात मिळालं लाखोंचं घबाड
सोलापूर : खते व कृषि औषधे निर्मिती कंपनीच्या उत्पादित मालाचे नमुने घेऊन मालकावर कारवाई न करण्याकरिता खाजगी इसमासह 50 हजार रुपयाची लाच स्वीकारलेल्या विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील गुणवत्ता नियंत्रण अधिकाऱ्यास रंगेहात पकडण्यात आलंय. दत्ता नारायण शेटे (वय ४२ वर्षे, पद-तंत्र अधिकारी) असं लाचखोर अधिकाऱ्याचं नांव आहे. त्यांच्या शासकीय वाहनातून एसीबी पथकानं शनिवारी लाचेच्या रक्कमेबरोबर लाखो रुपयांची रोकड हस्तगत केलीय. याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं सांगण्यात आलंय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, पुणेस्थित विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील गुणवत्ता नियंत्रण तंत्र अधिकारी दत्ता नारायण शेटे यांनी, कृषी खते व औषधे निर्मिती कंपनीतून उत्पादन झालेले खते व शेती औषधांचे सॅम्पल घेऊन त्यावरुन तक्रारदार यांचे कंपनीवर कोणतीही कारवाई न करण्याकरीता तंत्र अधिकारी दत्ता नारायण शेटे यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपये लाचेची मागणी करुन, लाच रक्कम स्वतः स्विकारुन ती खाजगी इसम प्रमोद सुरवसे (वय ३९ वर्षे, व्यवसाय शेती, रा. घर नं- २४३, हरीहर महाराज मठाजवळ, पंढरपूर) याच्याकरवी त्यांच्या शासकीय वाहनामध्ये ठेवली असताना दोन्ही आरोपींताना रंगेहात पकडण्यात आलं आहे.
तसेच लाच रक्कम मिळून आलेल्या शासकीय वाहनाची झडती घेतली असता, शासकीय वाहनामध्ये लाच रक्कमेव्यतिरिक्त भारतीय चलनी नोटांचे वेगवेगळे एकूण १७ बंडल मिळून आले. ही रक्कम ६,१४,००० रुपये मिळून आले. त्यासंबंधी आरोपी शेटे ( रा. शरयु फ्लॅट नं ४ बी/०२ म्हाडा कॉलनी मोरवाडी, पिंपरी पुणे) यांनी समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्याने ती रक्कम जप्त करण्यात आलीय. दोन्ही आरोपींविरूध्द गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.
पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे/खराडे (एसीबी, पुणे) यांनी मार्गदर्शन अधिकारी म्हणून तर पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार (एसीबी, सोलापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक पोलीस अंमलदार पोह अतुल घाडगे, पोह/सलिम मुल्ला पोना/स्वामीराव जाधव, चापोह/राहुल गायकवाड (सर्व नेम. एसीबी, सोलापूर) यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
...नागरिकांना आवाहन
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सोलापूर जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, भ्रष्टाचारासंबंधीत काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असं आवाहन पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांनी केलंय.
संपर्क पत्ता- पोलीस उपअधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, श्री छत्रपती शिवाजी महाराज रंगभवन चौक, सोलापूर.
संकेतस्थळ www.acbmaharashtra.gov.in
ई मेल- www.acbwebmail@mahapolice.gov.in
ऑनलाईन तक्रार अॅप acbmaharashtra.net
टोल फ्री क्रमांक .१०६४
दुरध्वनी क्रमांक- ०२१७-२३१२६६८
व्हॉटस अॅप क्रमांक- ९९३०९९७७००