सोलापूर : सोलापूर-तुळजापूर मार्गावर जा-ये करणाऱ्या वाहनांमुळे दर्शनाकरीता तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांना अडथळा, गैरसोय वा अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याची दक्षता म्हणून १४ ऑक्टोबरच्या रात्रौ ००:०१ वा. पासून ते १७ ऑक्टोबर रोजी रात्रौ २४:०० वा. पर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद करून अन्य मार्गाने वळविण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिलीय.
यंदाची कोजागिरी पोर्णिमा बुधवारी, १६ ऑक्टोबर रोजी येत आहे. दुसऱ्या दिवशी गुरुवारी, १७ ऑक्टोबर रोजी मंदिर पौर्णिमेनिमित्त श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविक दर्शनाकरीता मोठ्या प्रमाणात सोलापूरहून तुळजापूरकडे पायी चालत जात असतात. या निमित्ताने सोलापूर-तुळजापूर मार्गावरील सर्व प्रकारच्या वाहनांना येण्यास व जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. वाहतुकीस बंद करण्यात आलेल्या मार्गावरील पुढीलप्रमाणे वळविण्यात आली असल्याचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी सुचित केलंय.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील सोलापूर शहरातील जुना तुळजापूर नाका ते तुळजापूर शहर
वाहतूकीस पर्यायी मार्ग खालीलप्रमाणे
१) पुणे महामार्गाकडून छत्रपती संभाजी नगर कडे जाणारी वाहने सोलापूर (बाळे गांव)-बार्शी-येरमाळामार्गे छत्रपती संभाजीनगर करीता पथक्रमण करतील.
२) पुणे महामार्गाकडून धाराशिव कडे जाणारी वाहने सोलापूर (बाळे गांव) वैराग मार्गे धाराशिव करीता-पथक्रमण करतील.
३) पुणे महामार्गाकडून लातूर कडे जाणारी वाहने-सोलापूर (बाळे गांव) बार्शी- येडशी-ढोकी-मुरुडमार्गे-लातूरकरीता पथक्रमण करतील.
४) सोलापूर/पुणे महामार्गाकडून तुळजापूर कडे जाणारी वाहने -हैद्राबाद महामार्गावरील सोलापूर (मार्केट यार्ड)-बोरामणी गांव-इटकळ-मंगरुळ पाटी मार्गे तुळजापूरकरीता पथक्रमण करतील, असंही त्यांनी निर्देशित केलंय.
हा आदेश १४ ऑक्टोबर रोजीचे रात्रौ ००:०१ वा.पासून ते १७ ऑक्टोबर रोजीचे रात्रौ २४:०० वा. पर्यंत अंमलात राहील. सदर आदेशाचा भंग करणारा व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम १३५ अन्वये शिक्षेस पात्र होईल. या आदेशाला पोलीस खात्याची वाहने, अत्यावश्यक सेवेची व पोलीस ज्या वाहनास परवानगी देतील, अशी वाहने अपवाद असतील असंही त्यांनी म्हटलंय.