Type Here to Get Search Results !

आम्हाला पिळवणूक मुक्त आयुष्य जगता येईल, का...?


अधून-मधून महिला वा तरुणीच लैंगिक शोषण अथवा अत्याचाराच्या घटना घडतात, सोशल मिडियावर गाजा-वाजा होतो. अमुक कायदा करू, तमुक शिक्षा करु, पोकळ आश्वासन दिली जातात. मेणबत्या पेटवून स्त्री सबलीकरण, सक्षमीकरणाचा डंका पिटला जातो. वेळ जाईल तसं परिस्थिती पूर्ववत होते. स्री स्वातंत्र्य, सबलीकरण, सक्षमीकरण यापेक्षा माझ्या डोक्यात अगदी साधा प्रश्न येतो, आम्ही पिळवणुक मुक्त आयुष्य जगू शकतो का ?

आधीच्या काळात म्हणजे आमच्या पणजी, आजीच्या काळात शिक्षण, आधुनिक सुविधा, वैचारिक मागासलेपण यासारख्या समस्या होत्या. त्यामुळे त्यांची पिळवणूक होते, असे असं आपणच आपल्याला समजावून सांगत. 21 व्या शतकात बरीच प्रगती होऊन आम्ही आधुनिक झालो, पण साध्या-साध्या गोष्टीतून होणारा त्रास आजही आमची पाठ सोडत नाही.

कधी-कधी आम्हाला स्वातंत्र्य कशाचं मिळालं, हाच प्रश्न पाठ सोडत नाही. कूटूंबाचा, समाजाचा पाया म्हणजे स्त्री ! मुलगी जन्माला आली की, ते  काचेचं भांड तिला तडा नको जायला, मुलगी परक्याच धन... विचारांनी पुढारलेले, सुखवस्तू जीवन जगणार सगळेच कमी-जास्त प्रमाणात दहशतयुक्त वातावरणात मुलींचा सांभाळ करतात. 

आजकाल शिक्षणाच्या बाबतीत कोण आडकाठी करत नाही. शिक्षणासोबतच संस्कार, कौटुंबिक जबाबदारी अशा बऱ्याच  गोष्टींचे प्रशिक्षण मिळत असतंच. खरं तर ही एक चौकट आहे आणि या चौकटीत राहून जी जीवन जगेल ती सर्वगुण संपन्न. यापेक्षा थोड्याजरी वेगळ्या Activity केल्या. चुकून त्यात show flop झाला तर टीका, अपमान, अवहेलना, अगदी खानदानात कोण असं नव्हतं इथपर्यंत तुम्हाला एकून घ्याव  लागेल.

काही आकडी पगाराची नोकरी लागली तर आर्थिक आत्मनिर्भर पण तरीही कपडे कोणते घालायचे, कोणाशी बोलायचं, बोलायचं नाही, कुठे जायचं नाही, काय खायचं, या आणि अशा कित्येक गोष्टी  आई-वडिलांना विचारूनच कराव्या लागतात. 

कॉलेज जीवन किंवा नोकरी क्षेत्रात स्थिर स्थावर झाल्यानंतर आजकाल एक कळीचा मुद्दा बनला आहे, तो म्हणजे प्रेम प्रेमविवाह ! आजकालच्या मुलीचं प्रेम अगदी शाळा, ज्यूनिअर कॉलेज पासूनच  सुरु होतं. त्याला फार काही भवितव्य नसतं, पण एक गोष्ट आहे की, घरात आपल्या जवळच्या लोकांकडून मिळणारी वागणूक किंवा आपल्या मतांचा, विचारांचा अनादर झाला की, परकी व्यक्ती आपलिशी वाटून तिच्यातच सर्वस्व शोधलं जातं. 

कामाधंद्याला लागून किंवा चार पैसे कमवायचं ज्ञान आहे, लग्नाच्या वयात आहे, अशा पोरींना सुद्धा सत्व परिक्षा द्यावीच लागते. आज कालची पिढी ही मन, विचार, तत्वे यावरून आयुष्याचा जोडीदार निवडते पण पालकांचा अट्टहास  हा Well settled असा असतो. काही मुली याला अप‌वादही असतात, म्हणजे त्यांना बक्कळ पैसे कमवणारा पाहिजे असतो, या सगळ्या Process मध्ये मुलगी म्हणजे डोक्यावरचा भला मोठा भार असतो. घरच्यासाठी मुळात ह्या सगळ्या गोंधळात जो पालकवर्ग आहे, त्यांची लग्न तर अशीच काका, मामा, नाना अशा व्यक्तींनी जमवून दिलेली असतात. आजकालची परिस्थिती त्या मानाने खूप सुधारली आहे, ही गोष्टच त्यांना मान्य नसते. शेवटी बंधने, मानसिक छळ, त्रागा धरून बिचाऱ्या पोरीची पाठवणी तुझं नशीब आणि तू म्हणून केली जाते.

नवरा जो तिचं येथून पुढचं भवितव्य असतो. चांगला निघाला, म्हणजे तिच्या मतांचा आदर करणारा, तिला साथ देणारा तर संसार छान होतोच. पण चुकुन पण व्यसनी, उधळ्या निघाला तर तिला हिंमतीन उभं राहावंच लागत. नोकरी करणारी असेल, तर केवळ आर्थिक निर्भर असते ती. घर, मुलं, सासू सासरे प्रत्येकांच्या छोट्यातल्या छोट्या गरजा पुरवून स्वतःच अस्तित्व जपण्याचा प्रयत्न करते, पण पुरुष अहंकारी  असतातच. 

बायकोने कमवणे म्हणजे आपण काय कमी level चे आहोत, काय असा समज करून घेतात तुम्हा बायकांना घरातलं सोडून बाकी काही कळत नाही, हा तर फेमस डायलॉग असतो. 24 तास घरात हात राबणे म्हणजे परमकर्तव्य ! सगळा व्याप सांभाळत म्हातारपणाला पोरांना बक्कळ प्रॉपर्टी असेल तर ठीक नाही तर म्हातारपणात पण पोरं म्हणतेतच काय करुन ठेवलंय आमच्यासाठी...

स्त्रीयांमध्ये अलौकिक शक्ती असते. सहनशिलता हा तिचा हुकमी एक्का आहे. आपल्या घरातल्या स्त्रियांशी दोन शब्द प्रेमाने बोलून पहा ना.., चिडचीड राग-राग तर रोजच असतो. कधीतरी तुला फार कंटाळा आला असेल, जरा बाहेर फिरुन येऊ, बोलाना..., तू कर गं हवं ते, मी आहे तुझ्यासोबत बोलून तर पाहा ना, कधी तर तिची मत ऐकून तिच्या बाजूने stand घेऊन तर पहा ना. ती अख्खं आयुष्य जगते इतरांच्या सुखासाठी तिच्या थकलेल्या मनाला प्रफ्फुल्लित करुन 2 मि.ची Smile  चेहऱ्यावर आणून तर पहा ना... 

अत्याचार, लैगिंक शोषण, कायदे, कोर्ट, केसेस हे काही घटनांनमुळे समोर येतं. पण रोज आपल्या घरात आपको पत्नी, मुलगी, आई किती समाधानी आहेत, याचं मोजमाप होतं का ? फार काही नाही.. दोन प्रेमाचे शब्द हीच तिची ताकद असते. पण आपण मात्र तिला योग्य-अयोग्यतेच्या तराजूत मोजत बसतो. 

एकाच्या पोटी जन्म घेऊन दुसऱ्याच्या कुळाचा  उद्‌धार करायचा असतो तिला... मान, अपमान, अवहेलना सगळ सहन करून हसत मुखाने सामोरे जाते ती... सगळीचं जबाबदारी नका टाकू तिच्यावर.... तिची पण घुसमट होते मग, तिच्यातल्या तिला जपता येत नाही, मग तिला पण वाटत मनमुराद जगावं आयुष्य पण नाती, गोती जबाबदाऱ्या आड येतात. तेही स्विकारत जाते ती पुढे पण द‌मछाक होते खुप तिची...

खरं तर स्त्रियांनी कितीही मोठं यश संपादन करू देत  जगाच्या दृष्टीने त्याच मुल्य कवडीमोड असतं. पण ती लेकरांचा आत्मविश्वास वाढवते. नवऱ्याच्या पाठीमागे खंबीर उभी राहते . खरंच ती तुमचं आयुष्य राॅकस्टार बनवते.

शेवटी कोणी काही म्हणा, लढा हा एकट्याचाच असतो ना ... असं पण जगाच्या गाडा चालवणाऱ्या देवी, देवता तुळजाभवानी, महालक्ष्मी, अगदी विठ्ठलाच्या पाठी उभी असणारी रखुमाई एकट्याचं आहेत की उभ्या.... तुलाही एकटचं उभं राहावं लागेल, कारण हा महाराष्ट्र आहे आणि येथे कौतुक करुन घेण्यासाठी मरावं लागतं, हा आपला इतिहास आहे.

लेखन- अबोली व्यवहारे, करकंब.