सोलापूर : सोलापुरातील साखर कारखान्यांनी 2023-24 गळीत हंगामातील ऊस बिले शेतकऱ्यांना आदां न केल्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झालीय. येत्या दसरा दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना थकीत ऊस बिले दिले नाही तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने कारखान्यासमोर तीव्र आंदोलन करण्याच्या इशारा जिल्हाधिकारी यांच्याकडं दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
सोलापुरातील अनेक कारखान्यांनी 2023-24 गळीत हंगामातील थकीत ऊस बिले शेतकऱ्यांना अद्याप दिले नाही. शेतकऱ्यांचा ऊस जाऊन 10 ते 11 महिने झाले, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावर कारखानदारांनी रक्कम अदा केली नाही. हे बिल लवकर न भेटल्याने खरीप हंगामातील पेरणीकरिता देखील शेतकऱ्यांना नाना अडचणींचा सामना करावा लागला.
उसाच्या संगोपणाचे 12 महिने आणि त्यानंतर 11 महिने असे दोन वर्ष उलटून गेली तरीसुद्धा शेतकऱ्यांना ऊस पिकाचे पैसे खात्यावर येत नाहीत. त्यामुळे शेतकरी ऊस पीक आपल्या शेतात लावावे, की नाही या संभ्रमावस्थेत आहे. घामाचा दाम वेळेवर न मिळाल्यास शेतकरी सावकारीकडे कर्ज काढायला जातो. ते कर्ज व त्यावरील व्याज फेडण्याची कुवत हरविलेला बळीराजा आत्महतेच्या शेवटच्या टोकापर्यंत येऊन ठेपतो.
आता दसरा दिवाळी हे महत्वाचे सण येत आहेत. शेतकऱ्यांच्या घरची दिवाळी गोड व्हावी. यासाठी सरकारने या बाबतीत तातडीने लक्ष घालून त्वरीत ऊस बिले अदा करण्याचा आदेश द्यावा, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मोठे शेतकरी आंदोलन उभारण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय.
त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ शेतकऱ्यांचे ऊस बिल त्यांच्या खात्यात जमा करण्याचा आदेश सरकारने द्यावा, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने शेतकऱ्यांना घेऊन कारखान्यासमोर उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, जिल्हा संपर्कप्रमुख छत्रूघ्न माने, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, दक्षिण तालुका अध्यक्ष शेखर चौगुले, दिलीप निंबाळकर, कार्याध्यक्ष सिताराम बाबर, अरविंद शेळके, मल्लू भंडारे आदी उपस्थित होते.