सोलापूर : खंडणी मागणाऱ्या योगेश रामचंद्र कोळेकर याच्या गुन्हेगारी कृत्यास प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी २५ ऑक्टोबर रोजी त्याच्याविरुध्द एमपीडीए अधिनियमांतर्गत स्थानबध्दतेचे आदेश निर्गमित करुन त्यास येरवडा कारागृह, पुणे येथे दाखल करण्यात आलंय.
शहरातील जोडभावी पेठ व जेलरोड पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार योगेश रामचंद्र कोळेकर, (वय २५ वर्षे रा. घर नं.४१/७५, न्यु बुधवार पेठ, सोलापूर) हा मागील काही वर्षांपासुन सातत्याने घातक शस्त्राचा वापर करुन खूनाचा प्रयत्न करणे, घातक शस्त्रांनी इच्छापुर्वक दुखापत करणे, जबरी चोरी करणे, खंडणी मागणे, धाकदपटशा करणे, गैरकायद्याची मंडळी जमविणे, दगडफेक करणे, शस्त्रानिशी फिरुन धमकी देणे अशा स्वरुपाचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करीत आला आहे. त्याच्या विरुध्द अशा प्रकारे एकूण ०३ गंभीर स्वरुपाचे गुन्हे व ०२ अदखलपात्र गुन्हा सोलापुरात दाखल आहेत.
त्याचे या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापुर शहरातील नागरीकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन, सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे. योगेश रामचंद्र कोळेकर याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे, त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरीकांमध्ये दहशत असून, त्याच्याविरुध्द सामान्य नागरीक उघडपणे पोलीसांना माहीती देत नाहीत, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
योगेश रामचंद्र कोळेकर यास त्याच्या गुन्हेगारी कारवायापासून परावृत्त करण्यासाठी सन २०२१ मध्ये क. १०७ फौ. प्र. सं अधिनियमानुसार प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही. त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी वरीलप्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालू ठेवली. त्यामुळे ही स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलीय.