Type Here to Get Search Results !

पिस्टल व 2 जिवंत राऊंड विक्रीसाठी आलेला आंतरराज्य गुन्हेगार जेरबंद; 1 लाखाचा मुद्देमाल हस्तगत


 स्थानिक गुन्हे शाखेची महत्वपूर्ण कामगिरी

सोलापूर : ग्रामीण पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार टाकलेल्या छाप्यात 1 पिस्टल व 2 जिवंत राऊंड  विक्रीसाठी आलेला आंतरराज्य गुन्हेगार जेरबंद करण्यात आलंय. त्याच्या ताब्यातून  1,00,400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. करीम हमीदसाब मुरली (वय 48, रा. खजुरी, ता. आळंद, जि. कलबुर्गी) असं त्याचं नांव असून  अग्निशस्त्र खरेदी आलेल्या चंद्रकांत ऊर्फ चंदु विश्वनाथ लांडगे (वय-38 वर्षे) यालाही गजाआड करण्यात आलंय. न्यायालयाने उभयतांना चार दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

होऊ घातलेल्या  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी पोलीस अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील अवैध धंद्यावर तसेच अवैध अग्निशस्त्राबाबत विशेष शोध मोहिम राबवून कारवाई करणेबाबत आदेशीत केले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सूचना दिल्या होत्या.

सपोनि नागनाथ खुणे व पथकातील पोलीस उपनिरीक्षक खाजा मुजावर यांना अवैध अग्निशस्त्रासंबंधी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी फाटा येथील संभाजी हॉटेल येथे सापळा रचला.

तेथे  दोन इसम गावठी कठ्ठ्याचा व्यवहार करत असताना मिळून आले. त्यांचेकडे अधिक तपास करता करीम हमीदसाब मुरली याच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल विक्री करून आलेली 5,000 रूपयांची रोख रक्कम, मोबाईल मिळून आले तर ती विकत घेणारा चंद्रकांत ऊर्फ चंदु विश्वनाथ लांडगे (रा. बसवेश्वर नगर, सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना जवळ, होटगी रोड, सोलापूर) याच्या कब्जात खरेदी केलेले एक देशी बनावटीचे पिस्टल व 02 जिवंत राऊन्ड मिळून आली.

यासंबंधी उभयता विरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा क. 3,7/25, भा.न्या.सं.3(5), म.पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. आरोपींना 4 दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,
अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे  पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली स.पो.नि. नागनाथ खुणे, पोलीस उपनिरीक्षक खाजा मुजावर, स. फौ. नारायण गोलेकर, विजयकुमार पावले, पोलीस अंमलदार धनाजी गाडे, मोहन मनसावाले, सलिम बागवान, अक्षय डोंगरे, सागर ढोरे-पाटील, समीर शेख यांनी बजावली.

अशी आहे आरोपींची क्राईम हिस्ट्री !

करीम हमीदसाब मुरली याच्यावर यापुर्वी उमरगा पोलीस ठाणे येथे खूनाचा 1 गुन्हा, अवैध शस्त्र विक्रीचा सोलापूर शहर येथे 1 गुन्हा व आळंद पोलीस ठाणे, कर्नाटक येथे 2 गुन्हे असे एकूण 4 गुन्हे दाखल आहेत.

चंद्रकांत ऊर्फ चंदु विश्वनाथ लांडगे याच्यावर यापुर्वी विजापूर नाका, पोलीस ठाणे येथे अवैध शस्त्र बाळगल्याचा 1 गुन्हा दाखल आहे. जेलरोड पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे 1 व वळसंग पोलीस ठाणे येथे 1 मारामारीचे गुन्हे दाखल आहेत.