शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
सोलापूर : दुचाकीवर ट्रिपल सीट चाललेल्या त्रिकुटाला वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांनं थांबवण्याचा प्रयत्न केल्यावर वर्दीच्या कॉलरला पकडून बघून घेण्याची धमकी देण्यात आलीय. ही घटना येथील मार्केट यार्ड चौकात बुधवारी घडलीय. पोलिसाला बघून घेण्याची धमकी दिलेल्या तरूणानं खिशातील ब्लेड काढून स्वतःला मारुन घेतल्यानं पांढऱ्या शुभ्र शर्टाला रक्ताचा डागला. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी तिघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या घटनेची अधिक माहिती अशी, १६ ऑक्टोबर रोजी मार्केट यार्ड चौकात वाहतूक नियमन कर्तव्यास असलेल्या वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी मार्केट यार्ड येथील गर्दीतून पुणे रोडकडे एमएच. 13 /ई.एल. 9522 क्रमांकाच्या दुचाकीवर चाललेल्या तिघांना थांबण्याचा इशारा केला. ते न थांबता पुढे जात असताना त्यांना थांबवून, तुम्ही पोलीसांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन का करता, अशी विचारणा केली.
त्यावेळी त्या दुचाकीवरील तिघांनी अरेरावी करीत पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर धावून येऊन वर्दीच्या शर्टची कॉलर पकडून तुला बघुन घेतो, असे म्हणत त्यातील संतोष संजय कांबळे यांने दारुच्या नशेत त्याच्या खिशातील ब्लेड काढुन स्वतःहून त्याच्या डाव्या हातावर ब्लेडने वार करुन स्वतः जखमी झाला. या घटनेत वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याच्या पांढऱ्या शुभ्र शर्टाला रक्ताचा डाग लागला.
याप्रकरणी सरकारी कर्तव्यात अडथळा केल्याप्रकरणी संतोष संजय कांबळे (वय 39 वर्ष), मल्हारी सतिश काळे (वय 27 वर्ष) आणि रोहित परमेश्वर कांबळे (वय 29 वर्ष, सर्व रा. जय मल्हार चौक, बुधवार पेठ, सोलापूर ) या आरोपींविरुध्द जेलरोड पोलीस स्टेशन येथे भा. न्याय. सं. कलम. 132, 223, 3/5 सह मो. वा. का. क. 185 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय.