Type Here to Get Search Results !

आसक्ती, आळस, क्रोध आणि संशय हेच पूर्णयोगातील गतिरोध : ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी

                                      (सर्व छायाचित्रे : नागेश दंतकाळे)

रसिकांच्या भरभरून प्रतिसादात यंदाच्या तीन दिवसीय विवेकाची अमृतवाणीचा समारोप

सोलापूर : जीवनात कटुता, तणाव, आसक्ती, क्रोध, आळस आणि संशय यांच्यामुळेच पूर्णयोगात गतिरोध निर्माण होतो, असं प्रतिपादन ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांनी केले.

महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, दक्षिण सोलापूर आणि आर्यन क्रिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिवाळीपूर्व विवेकाची अमृतवाणी कार्यक्रमाचा समारोप रविवारी, 27 ऑक्टोबर रोजी झाला. यावेळी ते बोलत होते.


योग करण्यापुरता मर्यादित न राहता जगण्यापुरता असला पाहिजे. अदृश्य भय हे पूर्णयोगातील बाधा आहे. भय चुंबकाप्रमाणे आकर्षले जाते. म्हणूनच बाधा दूर करण्यासाठी भगवंताला शरण गेले पाहिजे. संपूर्ण जीवन योग आहे. सत्य शिव सुंदर हे व्यक्तीमत्वाचे पैलु आहेत. प्रत्येक जीवात आध्यात्म आहे. असेही निरूपणकार विवेक घळसासी यांनी सांगितले. महायोगी अरविंद यांनी पूर्णयोगामध्ये हेच सांगितले, असेही ते पुढे म्हणाले.


प्रारंभी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरचे कार्याध्यक्ष प्रशांत बडवे यांनी प्रास्ताविक केले. जितेंद्र महामुनी यांच्या शंखनादात निरूपणकार विवेक घळसासी यांचं आगमन झाले. तिसर्‍या दिवशीच्या निरूपण कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य रोजगार हमी परिषदेचे अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे नेते शहाजी पवार यांच्या हस्ते निरूपणकार विवेक घळसासी यांना पुष्पहार घालण्यात आला आणि निरूपणाला प्रारंभ करण्यात आला.

गेल्या 14 वर्षापासून अखंडपणे सुरू असलेल्या दिवाळी पूर्व विवेकाच्या अमृतवाणी कार्यक्रमाच्या यंदाच्या वर्षीही श्रोत्यांनी मोठ्यासंख्येने गर्दी करून चांगला प्रतिसाद दिला याबद्दल कार्यवाह जितेश कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.


या कार्यक्रमाला सोलापूरच्या पु.ना. गाडगीळ सराफ पेढीचे व्यवस्थापक जितेंद्र जोशी, आर्यन क्रिएशनचे विनायक होटकर, ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतिले, सुयश गुरूकुलचे केशव शिंदे, डॉ. रविंद्र पाठक, डॉ. माधुरी दबडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.


सकाळी 6.25 वाजता वेळेवर सुरू झालेल्या या तीन दिवसीय विवेकाच्या अमृतवाणी कार्यक्रमाला अ‍ॅम्फी थिएटरमध्ये रसिक श्रोत्यांनी मोठी गर्दी केली होती.