सोलापूर : सोलापूर शहरातील होटगी रोड येथे नवीन विमानतळाचे काम पूर्ण होऊन लवकरच उद्घाटन होऊन विमान वाहतुकीस सुरुवात होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी तात्काळ नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती करणे आवश्यक असून त्या दृष्टीने तात्काळ कारवाई व्हावी, अशा आशयाचे निवेदन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आले.
होटगी रोडवरील विमानतळाचा प्रश्न मार्गी लागला असून लवकरच त्याचे उद्घाटन होणार आहे. या भागातील वाढती वसाहती व लोकसंख्या विचारात घेता सोलापूर विमानतळासाठी स्वतंत्र नवीन पोलीस ठाणे होणे अत्यंत आवश्यक आहे. या परिसरात अनेक नवीन वसाहती वाढल्या असून लोकसंख्येच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
विजापूर नाका पोलीस ठाणे व एमआयडीसी पोलीस ठाणे हे अंतर जास्त असल्यामुळे नागरिकांच्या दृष्टीने गैरसोयीचे होत आहे. या भागात नागरिकांसाठी जवळची पोलीस ठाणे होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे दोन्ही पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होण्यास हातभार लागण्याबरोबर या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोलाची मदत होणे शक्य होणार आहे.
सिव्हिल हॉस्पिटलच्या धर्तीवर गुरुनानक चौकातील नवीन नवजात शिशु व महिला हॉस्पिटल येथे पोलीस चौकीची अत्यंत आवश्यकता आहे. एमएलसीसाठी नागरिकांना सिव्हिल हॉस्पिटल येथे ये-जावे लागते. त्यामुळे त्यांचा वेळ व गैरसोय होत असून तात्काळ या ठिकाणीसुद्धा पोलीस चौकी होऊन पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे आवश्यक आहे, तरी नागरिकांची मागणीची व संभाजी ब्रिगेडच्या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ वरील ठिकाणी पोलीस ठाणे व नूतन सिव्हील हॉस्पिटलमध्ये पोलीस चौकी तात्काळ सुरू करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आलीय.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्रातील श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, महिला शहराध्यक्ष मोनाली धुमाळ, मनीषा कोळी, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, सिताराम बाबर, बबन डिंगणे, फिरोज सय्यद, सागर ओहाळ आदी उपस्थित होते.