Type Here to Get Search Results !

पत्रकारावरील अन्यायकारक तडीपारीचा निषेध; पत्रकार कृती समितीचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


सोलापूर : एमडी 24 न्यूज चे संपादक सैपन शेख यांच्यावर झालेल्या अन्यायकारक तडीपारीचा पत्रकार कृती समितीनं निषेध नोंदवत या तडीपारीसंदर्भात संपादक सैपन शेख यांना शासन दरबारी न्याय मिळावा, अशा मागणीचं निवेदन गुरूवारी, १९ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय. 

पत्रकार सैपन शेख यांची सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घेता, त्यांच्यावर कुठलेही गंभीर गुन्हे दाखल नाहीत, केवळ आणि केवळ प्रशासनाच्या भोंगळ कारभाराची त्यांनी पोलखोल करून अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार समाजापुढे आणला, म्हणून सूडबुद्धीने त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे आहेत. 

ज्या आडून पत्रकार सैपन शेख यांच्यावर पोलीस आयुक्तालयानं तडीपारीची कारवाई केलीय, मात्र पत्रकार शेख यांनी भ्रष्ट व्यवस्थेचे वाभाडे काढलेल्या कोणत्याही गैरकारभाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचं औदार्य वा धाडस शासन-प्रशासन व्यवस्थेने केलेलं नाही, हे सुर्यप्रकाशाइतकं सत्य आहे. 



लोकशाही राज्यात संविधानाची कास धरणारा आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जाणारा तसेच आपल्या निर्भीड लेखणीतून वास्तविकता परखडपणे मांडणाऱ्या खऱ्या पत्रकाराची लेखणी बोथट करण्याचा प्रशासनाचा कुटील डाव तर नाही ना ?, असाही सवाल यावेळी उपस्थित करण्यात आलाय.  

पत्रकार कृती समिती सोलापूर शहर-जिल्ह्याच्या वतीने पत्रकार सैपन शेख यांच्यावरील अन्यायकारक तडीपारीचा आदेश काढल्याबद्दल जाहीर निषेध व्यक्त करताना या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी पत्रकार कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्यानिवेदनात करण्यात आलीय. 

यावेळी उपस्थितामध्ये कृती समितीचे अध्यक्ष अब्दुल पठाण, प्रमुख सल्लागार यशवंत पवार, कार्याध्यक्ष डी. डी. पांढरे, उपाध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे, सचिव शब्बीर मणियार, संघटक लतीफ नदाफ, उपसंघटक युनुस अत्तार, खजिनदार रजाक मुजावर, 'लोकशाही मतदार' चे संपादक अक्षय बबलाद, अशोक ढोणे, इस्माईल शेख, प्रसाद जगताप, फैयाज शेख, युवराज वाघमोडे, अस्लम शेख इत्यादी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.