सोलापूर जिल्ह्यातील २६ महाविद्यालयांचा समावेश
या कार्यक्रमास जास्तीत जास्त बेरोजगार युवक युवतीने आपल्या महाविद्यालयातून ऑनलाईन उपस्थित राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
सोलापूर : महाराष्ट्र राज्यातील १००० आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या शुभहस्ते ऑनलाईन पध्दतीने शुक्रवारी, २० सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी १२.३० वाजता जिल्हा वर्धा येथून संपन्न होणार आहे. यामध्ये सोलापूर जिल्हयातील २६ महाविद्यालयांचा समावेश आहे.
कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक युवतींना व्हावा, या दृष्टीकोनातून राज्यामधील नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करुन महाविद्यालयीन युवक युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर राज्यातील नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे. या केंद्रामार्फत १५ ते ४५ वयोगटातील बेरोजगार युवक युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची २० सप्टेंबर २०२४ रोजी वर्धा येथे स्वावलंबी शाळेच्या प्रांगणात जाहीर सभा होणार असून यामध्ये प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजनेच्या लाभार्थ्यांना मार्गदर्शन व त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचे उद्घाटन व यशस्वी महिला स्टार्टअप्स चा सन्मान सोहळा तसेच आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांचे ऑनलाईन उद्घाटन, या तिन महत्वकांक्षी योजनांचा समावेश या कार्यक्रमात राहणार आहे.
आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राकरिता सोलापूर जिल्ह्यामधील निवड झालेल्या महाविद्यालयांचे केंद्र शासनाच्या Skill India Digital Hub या वेब Portal वर Training Center ला मान्यता घेण्यात येणार असून प्रत्येक प्रशिक्षण केंद्रात साधारण १५० युवक-युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
या योजनेंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील २६ महाविद्यालयांमध्ये Solar LED Technician, Domestic Data Entry Operator, Dairy Farmer/Entrepreneur, Dairy Worker, Goat/Sheep Farmer, Database Administrator, Web Developer, Social Media Executive, Accounts Assistant, Surveyor, Draughtsman Mechanical, Draftsperson Civil Works, Software Developer Product Development, General Duty Assistant, Healthcare Hospital Front Desk Coordinator अशा प्रकारच्या ५२ कोर्सेसद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींनी या प्रशिक्षण केद्रांमध्ये नोंदणी करुन आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजनेचा लाभ घ्यावा व २० सप्टेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमास प्रत्यक्षीत नोंदणीकृत महाविद्यालयांच्या ठिकाणी जास्तीत जास्त उमेदवारांनी उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं आहे.