पाचवी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न
सोलापूर : सभासदांशी आपले विश्वासाचे नाते जपत बहुजन शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, सोलापूर या पतसंस्थेने सर्व सभासद, खातेदार व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने चांगली भरारी घेतली. सुलभ आणि पारदर्शक सेवेमुळे पतसंस्थेचा नावलौकिक असून हाच पतसंस्थेचा मानदंड आहे, असे प्रतिपादन पतसंस्थेचे संस्थापक तथा मानद सचिव समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी व्यक्त केले.
बाळे येथील श्री दिगंबरराव विश्वनाथ ढेपे प्रशाला येथे आयोजित केलेल्या बहुजन शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, सोलापूर या पतसंस्थेच्या पाचव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे चेअरमन प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड होते.
प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उद्घाटक जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील निवृत्त अधिकारी दिगंबर ढेपे, पतसंस्थेचे संचालक मिलिंद भालशंकर, संचालिका मंजुश्री खंडागळे, प्रतिभा गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यानंतर सभासदांच्यावतीने राम गायकवाड, सावकार कारंडे, नितीन गायकवाड यांनी पतसंस्थेच्या पारदर्शक कामकाजाचे कौतुक करीत पतसंस्थेचे आभार मानले. काशिनाथ जंगलगी यांनी विमा संदर्भात माहिती दिली. यावेळी पतसंस्थेतील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पतसंस्थेचे चेअरमन बोधिप्रकाश गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन व्हा. चेअरमन प्रा. युवराज भोसले यांनी केले तर संचालक प्रफुल्ल जानराव यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. यानंतर सभासदांना लाभांश वाटप करण्यात आले.