सोलापूर : येथील अनेक हाॅस्पिटलमध्ये महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत उपचार घेऊन देखील रूग्णांच्या नातेवाईकांकडून बिल आकारलं जात आहे. त्या रूग्णांच्या नातेवाईकांना धमकावून समाधानपत्र घेतलं जात असल्याची गंभीर बाब रूग्णसेवक आनंद गोसकी यांनी मिशन आयुष्यमान भारतचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या निदर्शनास आणली.
आयुष्यमान भारत मिशन अंतर्गत च्या योजनांच्या कामकाजाचा आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा शल्य चिकित्सक सुहास माने, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना सोलापूर जिल्हा समन्वयक डॉ. माधव जोशी, डॉ. दीपक वाघमारे, सोलापूर महानगरपालिकेच्या डॉ. मंजिरी कुलकर्णी जिल्ह्यातील विविध रुग्णालयाचे डॉक्टर्स व प्रतिनिधींची उपस्थिती होती.
या बैठकीत झालेल्या चर्चेदरम्यान रूग्णसेवक आनंद गोसकी यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर मिशन आयुष्यमान भारतचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी योजनेंतर्गत उपचार करून वा बळजबरीने समाधान पत्र लिहून घेणाऱ्या हाॅस्पिटलवर तात्काळ कारवाई करण्याचं आश्वासन दिले.
यावेळी पूर्व भागातील श्री मार्कंडेय सहकारी रूग्णालय महात्मा फुले जनआरोग्य योजना आयुष्यमान भारत योजनेत समाविष्ठ करून घेण्याची विनंतीही रूग्णसेवक आनंद गोसकी यांनी डॉ. शेटे यांच्याकडं केलीय.