नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची (DGCA) टीम करणार विमानतळाची दोन दिवस पाहणी
सोलापूर : होटगी रोड येथील विमानतळाचे नियमन आणि सुरक्षा निरीक्षण प्रणाली द्वारे सुरक्षितता आणि हवाई सक्षमता तपासणी करण्यासाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची (DGCA) टीम १० सप्टेंबर रोजी सायंकाळी सोलापूर येथे येणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मंगळवारी, १० सप्टेंबर रोजी सकाळी सोलापूर विमानतळावरील कामकाजाची व सुरक्षा व्यवस्थेची पूर्व पाहणी केली.
यावेळी सोलापूर विमानतळ चे अधिकारी चांपला बानोथ यांनी विमानतळाच्या पूर्ण होत असलेल्या कामकाजाची माहिती देऊन सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या उपाय योजनांची माहिती दिली.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय(DGCA)ची टीम ११ व १२ सप्टेंबर रोजी सोलापूर विमानतळावरून विमान सेवा सुरू करण्याच्या अनुषंगाने विमानतळाची पाहणी व तपासणी करणार आहे.
ब्युरो ऑफ सिविल एव्हिजन सिक्युरिटी (नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो) च्या अधिकाऱ्यांनी होटगी रोड सोलापूर विमानतळाची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध पातळीवर अत्यंत काटेकोरपणे तपासणी केली. विमानतळ प्राधिकरणकडून सुरक्षेच्या त्रुटींची पूर्तता केल्यानंतर पुन्हा ब्युरो ऑफ सिविल एव्हिएशन सिक्युरिटी चे अधिकारी तपासणीसाठी आलेले होते.
त्यांची तपासणी झाल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची टीम विमानतळाच्या विविध सुरक्षा मानके याबाबत तपासणी करण्यासाठी येत आहे.
तपासणी झाल्यानंतर त्यांच्याकडून प्रमाणपत्र मिळेल व त्यानंतर सोलापूर विमानतळ येथून विमानसेवा सुरू होण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे, असंही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.