सोलापूर : पोलीस आयुक्तालयाच्या ३२ व्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ०९ ते ११ ऑगस्टदरम्यान पोलीस कमिशनर ट्रॉफी (CP चषक) क्रिकेट स्पर्धा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पार पडल्या. या स्पर्धेमध्ये सर्व पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा, मुख्यालय, क्यूआरटी पथक, वाहतूक शाखा, पोलीस आयुक्त कार्यालय टीम यांच्या १२ संघानी सहभाग नोंदविला होता. अंतिम सामन्यात एमआयडीसी पोलीस ठाणे संघाने सहा गडी व २ चेंडू राखून सामना जिंकत पोलीस कमिशनर ट्रॉफी CP चषक सलग तिसऱ्यांदा जिंकला.
या १२ टीमचे ए बी सी डी असे चार गटामध्ये वर्गीकरण करण्यात आले होते. ०९ ऑगस्ट रोजी स्पर्धेचे उद्घाटन पोलीस उप आयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय) अजित बोऱ्हाडे यांच्या हस्ते झाले होते, तर उद्घाटनाचा सामना हा जेलरोड पोलीस स्टेशन व पोलीस आयुक्त कार्यालय टीम यांच्यामध्ये झाला होता.
मागील दोन दिवसांमध्ये साखळी गटाचे सामने होऊन सेमी फायनल मध्ये चार संघ आले होते. त्यामध्ये रविवारी, ११ ऑगस्ट रोजी सेमी फायनल चा पहिला सामना क्यू आर टी पथक व जेलरोड पोलीस स्टेशन यांच्यामध्ये होऊन हा सामना जेलरोड पोलीस स्टेशनने जिंकून फायनलमध्ये गेले तर दुसरा सेमी फायनल सामना हा एमआयडीसी पोलीस स्टेशन व गुन्हे शाखा यांच्यामध्ये होऊन सदर सामना हा एमआयडीसी पोलीस स्टेशनने जिकून फायनलमध्ये प्रवेश केला.
अंतिम सामन्यामध्ये जेलरोड पोलीस स्टेशन यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला व ८ षटकात ४ बाद ९८ धावा केल्या. यामध्ये वसंत माने ४२ धावा , विनोद दांडगे २५ धावा, हरीश पवार २० धावा केल्या. गोलंदाजीमध्ये एमआयडीसी संघाकडून राजपाल सरवदे, प्रवीण वाघमारे, महेश आरकाल यांनी प्रत्येकी १ खेळाडू बाद केले.
या धावसंख्येचा पाठलाग करताना एमआयडीसी पोलीस ठाणे संघाने ७.४ षटकात ४ बाद ९९ धावा करून विजय मिळवला. एमआयडीसी पोलीस ठाणे संघाकडून फलंदाजी मध्ये महेश आरकाल नाबाद ५८ धावा, प्रशांत सुरवसे १८ धावा, सुहास अर्जुन नाबाद १३ धावा केल्या गोलंदाजी मध्ये जेलरोड पोलीस ठाणे संघाकडून मनोज मोरे ३ व हर्षद मुजावर १ खेळाडू बाद केला. हा सामना एमआयडीसी पोलीस ठाणे संघाने सहा गडी व २ चेंडू राखून सामना जिंकला आणि पोलीस कमिशनर ट्रॉफी CP चषक स्पर्धा सलग तिसऱ्यांदा जिंकली. तसेच स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते झाले.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून चंद्रकांत मंजेली, अशोक डोंबाळे, गुणलेखक दत्ता बडगु, समालोचक म्हणून शंकर पवार, नागप्पा कोप्पा यांनी काम पाहिले.
... चौकट ...
... या खेळाडूंची नेत्रदीपक कामगिरी !
अंतिम सामन्यातील सामनावीर व उत्कृष्ट फलंदाज महेश आरकाल (१७४ धावा), स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज मनोज मोरे (७ विकेट), मालिकावीर राजू चव्हाण (१०७ धावा व ५ विकेट) यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.