सोलापूर : जिल्ह्याचे सुपुत्र सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेचे तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहिर करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील पोलीस आणि संरक्षण दलातील विविध विभागातील अधिकारी कर्मचार्यांना त्यांच्या गुणवत्ता आणि शौर्य तसेच विशेष सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहिर करण्यात आले.
कर्तव्य बजावत असताना केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आणि बजावलेल्या गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल पदक देऊन सन्मान करण्याची परंपरा राष्ट्रपती भवनाकडून कायम करण्यात आली. यंदाच्या या राष्ट्रपती पदकावर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याचे सुपुत्र दत्तात्रय तुळशीदास शिंदे यांचे नाव कोरले आहे.
मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात अप्पर पोलीस आयुक्त म्हणून सेवा बजावत असलेले दत्तात्रय शिंदे हे सन १९९६ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेतून उत्तीर्ण होऊन राज्याच्या पोलीस दलात सहभागी झाले. नाशिक येथे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनी गडचिरोली येथे पोलीस अधिक्षक म्हणून परिविक्षाधिन कालावधी पूर्ण केला त्यानंतर उपविभागिय पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी गोंदिया येथे सेवा बजावली.
सन २००१ मध्ये त्यांची सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी आपल्या धाडसी कामगिरीची चुणुक दाखवली. सन २००२ मध्ये सोलापूर शहरात उसळलेल्या जातीय दंगलीत त्यांनी अत्यंत कर्तव्य कठोरपणे काम करून जातीय दंगल शांत करीत कायदा व सुव्यवस्था आबाधित ठेवली. सोलापूर शहरातील त्यांच्या या धाडसी आणि संस्मरणीय सेवेबद्दल सोलापूरकरांनी त्यांचा मोठा सन्मानही केला.
त्यानंतर नवी मुंबई येथे पोलीस उपायुक्त म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली नंतर फोर्स वन चे पोलीस अधिक्षक, त्यानंतर सिंधुदुर्ग, सांगली येथे पोलीस अधिक्षक म्हणूनही त्यांनी कामगिरी पार पाडली. राज्य राखीव दल क्र.4 नागपूरचे समादेशक नंतर जळगांवचे पोलीस अधिक्षक त्यानंतर महावितरणचे कार्यकारी संचालक, नंतर पालघरचे पोलीस अधिक्षक असा प्रवास करीत ठाणे शहरातील कल्याणमध्ये अप्पर पोलीस आयुक्त म्हणून सेवा बजावत सध्या ते मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात अप्पर पोलीस आयुक्त म्हणून सेवा बजावत आहेत.
त्यांच्या या सेवा कार्यकाळात त्यांना पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्ह, खडतर सेवेबद्दल विशेष सेवा पदक, आंतरीक सुरक्षा पदक अशी महत्वाचे आणि मोलाचे पदक मिळाले तसेच त्यांनी पोटा, टाडा, मोक्का, एमपीडीए अशा विशेष कायद्यान्वये दाखल असलेल्या महत्वाच्या गुन्ह्याचा तपासही त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला.
त्यांच्या या विशेष कामगिरीची राष्ट्रपतीकडून दखल घेवून स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला त्यांना विशेष गुणवत्तापूर्ण सेवा राष्ट्रपती पदक जाहिर करण्यात आले. त्यांना मिळालेल्या या पदकाबद्दल सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील नागरीकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.