सोलापूर : नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असलेला पुरवठा विभाग कर्मचारी पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक यांच्या विरोधात आता रेशन दुकानदार संघटनेने दंड थोपटलेत. " नाईक हटाव, दुकानदार बचाव " असा त्यांनी नारा दिला आहे. पुरवठा निरीक्षक नाईक यांच्यावर निलंबनाची कारवाई न झाल्यास रेशन दुकानदार संघटनेने वाटप बंदचा निर्धार केला असून स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्टपासून संपावर जाण्याची घोषणा केलीय.
गेल्या काही वर्षांपूर्वी जिल्हा संघटनेने ह्याच पुरवठा निरीक्षकाची चांगलीच पोलखोल केली होती. पण वरिष्ठाच्या मध्यस्थीनं त्यावर एकदा पडदा टाकण्यात आला होता, मात्र नाईक यांच्या कार्यपध्दतीत सुधारणा होत नसल्याने दुकानदार चांगलेच कोंडीत अडकले आहेत. नाईक यांच्या विरोधात १८५ पानांचं ऐतिहासिक निवेदन ऑनलाईन पुराव्यासह वरिष्ठांकडे सुपूर्द केलं आहे. त्यामुळे बहुचर्चित सदानंद नाईक आता चांगलेच अडचणीत आल्याचं दिसतय.
प्रशासनाच्या अनेक उपक्रमात रेशन दुकानदारांची महत्वाची भूमिका असते. त्याचवेळी पुरवठा विभागाची दुसरी बाजू म्हटली जाणारे ह्याच रेशन दुकानंदाराच्या तक्रारींकडे प्रशासन जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असल्याचा जिल्हा संघटनेचा आरोप आहे. काही दिवसापूर्वीच सोलापूर लोकसभा खासदाराच्या गांव-भेटी दरम्यान नागरिकांनी पुरवठा निरीक्षक नाईकविरुद्ध तक्रारीचे पाढे वाचले होते.
त्याप्रमाणे चौकशी समितीही नेमण्यात आली होती. पण अद्यापपर्यत त्या चौकशी समितीचा अहवाल देखील बंद लखोट्यातच असल्याचा जिल्हा रेशन दुकानदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची तक्रार आहे. यावर अनेकदा तक्रारी होऊन सुद्धा 'कागदी घोडे' नाचवून सदानंद नाईक या त्यांच्या नजरेतील 'आपल्या' कर्मचाऱ्याला पाठीशी घालण्याचा प्रकार होत असल्याचा सामान्य नागरिकांचा आरोप आहे.
दुकानदार असो किंवा नागरिक कोणाच्याच तक्रारीला प्रशासनाने न्याय न दिल्याने या घटनाक्रमाला त्रासलेल्या जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी क्रांतिदिनाचे औचित्य साधत, ०९ ऑगस्ट रोजी रमेश बेंडे (उपायुक्त, पुरवठा विभाग, पुणे) यांना सोलापूर जिल्हा संघटनेच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील पुरवठा निरीक्षक नाईक यांच्या भ्रष्ट कारभारासंबंधी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई न झाल्यास येत्या स्वातंत्र्यदिनी, १५ ऑगस्टपासून सोलापूर जिल्ह्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकानदार धान्य वाटप बंद करून संपावर जाण्यासंबंधीचं निवेदन देण्यात आले.
ह्यावेळी राष्ट्रीय व राज्य फेडरेशनचे खजिनदार विजय गुप्ता, सुनिल पेंटर (जिल्हाध्यक्ष, सोलापूर), अभिजित सड्डो (अ झोन, अध्यक्ष), जुबेर खानमिया (क झोन, अध्यक्ष), हर्षल गायकवाड (ड झोन, अध्यक्ष) तसेच जिल्हा संपर्क प्रमुख नितीन पेंटर उपस्थित होते. नाईक हटाव मोहिमेत आता जिल्हा संघटनेला यश मिळणार का, याकडे जिल्ह्याचं लक्ष लागून आहे.