Type Here to Get Search Results !

' बेपत्ता ' असलेल्या महिलेचा दागिण्यांसाठी खून; मृतदेह पूलावरून नदीच्या पात्रात वाहत्या पाण्यात फेकला !


सोलापूर : रिक्षामध्ये प्रवासी म्हणून बसलेल्या महिलेची चोरी करण्याच्या उद्देशाने तिचा गळा दाबून जीवे ठार मारण्यात आले. ही खळबळजनक घटना बाळी वेस ते लांबोटी पुलादरम्यान २७ जुलै रोजी दुपारी ३ वा. च्या सुमारास घडली. साळुबाई नामदेव वाघमोडे (वय ६० वर्षे) असं मृत महिलेचे नांव असून तिच्या हत्त्येच्या गुन्ह्यात रिक्षाचालकासह एका विधी संघर्षग्रस्त बालकास पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलीस ठाण्याच्या दफ्तरी ' बेपत्ता ' नोंद असलेल्या महिलेच्या शोध कार्यात दागिण्यांसाठी खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह पूलावरून नदीच्या पात्रात फेकल्याची कबुली आरोपीनं दिलीय.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,  कस्तुरबा मार्केटमध्ये नेहमीप्रमाणे, सकाळी साळुबाई नामदेव वाघमोडे भाजी विक्रीच्या उद्देशाने आली होती. ती दुपारी २ वा. च्या सुमारास बाळी वेसेतून कोणास काही न सांगता निघून गेली, तिचा आप्तेष्ट व नातेवाईकांकडे शोध घेतल्यानंतर ती मिळून न आल्याने मुलगा अशोक वाघमोडे (रा. स्वागत नगर, सोलापूर) जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात यासंबंधी अर्ज दाखल केला. 

गेल्या पंधरा दिवसापासून बेपत्ता असलेल्या महिलेचा शोध घेत असताना, तपास अधिकाऱ्यांना जी माहिती मिळाली, त्या आधारे शुक्रवारी एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे प्रारंभी चौकशी करता, त्याने प्रारंभी उडवाउडवीची आणि पोलिसांची दिशाभूल करणारी माहिती पोलिसांना दिली. त्या माहितीनुसार पोलीस स्मशानभूमीतही पोहोचले, मात्र तिथं पोलिसांच्या हाती फारसं लागलं नाही. 

दिपक साळुंखे (वय ४० वर्षे, रा. जय मल्हार नगर, बाळे)  असं या गुन्ह्यातील संशयित आरोपीचं नांव आहे. याची कुणकुण झाल्यास त्याचा तपास कार्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असा तर्क करून पोलिसांनी शक्य तितकी गुप्तता पाळत, तपासकार्य पुढं सुरू ठेवलं आहे. संशयिताकडे सखोल चौकशी करता, त्याने जी माहिती दिली, ती मानवी मनाला हादरा देणारी तसेच पोलिसांनाही चक्रावणारी देणारी ठरली. 

आरोपी दिपक साळुंखे याने त्याचे सोबत असलेल्या विधी संघर्षग्रस्त बालकासह बाळी वेसेत एम एच १३ सी टी ५४८२ या क्रमांकाच्या रिक्षामध्ये भाजी विक्रेती साळुबाई नागेश वाघमोडे हिला बसवून घेऊन जाऊन जात असताना त्या रिक्षामध्ये दिपकने चोरी करुन जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने साळुबाईचा गळा हाताने दाबून तिला जिवे ठार मारले, हत्येनंतर तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले.

हा थरारक प्रकार एवढ्यावर न थांबता त्या रिक्षामधून दोघांनी तिचा मृतदेह पुणे-सोलापूर हायवेवरील लांबोटी येथील सिना नदी पुलावर जाऊन पुरावा नष्ट करण्यासाठी  सिना नदी पुलावरुन खाली नदीच्या पात्रात वाहत्या पाण्यात फेकून दिला. उभयतांनी संगनमत करुन चोरी करण्याच्या उद्देशाने तिचा गळा आवळून तिचे तोंडात स्कार्प कोंबून इच्छापूर्वक तिस जिवे ठार मारले असल्याची फिर्याद पोलीस उपनिरीक्षक नागेश येळे यांनी शनिवारी पहाटे दाखल केली.

त्यानुसार आरोपी दिपक साळुंखेसह दोघांविरूध्द भा न्या सं क १०३,२३८,३०९ (६),६१(२), ३(५) प्रमाणे जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चव्हाण या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.