मुंबई : अनेक मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलेले ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे शनिवारी, सकाळी निधन झाल्याची माहिती समोर आलीय. विजय कदम यांच्या पार्थिवावर ओशिवारातील स्मशानभूमीमध्ये दुपारी ०२ वाजता अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती त्यांच्या जवळच्या व्यक्तींनी दिलीय. सिनेरसिकांना सतत हसवत ठेवणारा चेहरा म्हणून विजय कदमांकडं पाहिलं जायचं, मात्र त्यांच्या जाण्यावर कर्करोग जिंकला, थांबली ' टूरटूर ' असं मानलं जातंय.
मराठी चित्रपटसृष्टी, छोट्या पडद्यावरील मालिका आणि रंगभूमीवर बहुरंगी भूमिका साकारलेले ज्येष्ठ अभिनेते विजय कदम गेल्या काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांनी त्यावर मात केली होती, मात्र त्यांचा कॅन्सर पुन्हा बळावला, त्यामुळे त्यांना पुन्हा अंधेरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांनी उपचारादरम्यान शनिवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला.
विजय दत्ताराम कदम असं त्यांचं नाव... ! १९८० च्या दशकात लहान-सहान विनोदी भूमिका साकारून त्यांनी आपल्या कारकीर्दीचा प्रारंभ केला. लहानपणी 'राजा भिकारी माझी टोपी चोरली' या बाल नाट्यात चेहऱ्याला रंग लावून हवालदाराची भूमिका साकारत त्यांनी रंगभूमीवर पहिलं पाऊल ठेवलं होतं, असं म्हटलं जातं. मुंबईच्या रूपारेल महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी रंगभूमीचा मार्ग निवडला.
विजय कदम यांची अनेक नाटकं रंगभूमीवर गाजली. विशेषतः 'विच्छा माझी पुरी करा', 'रथचक्र', व 'टूरटूर' ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली. 'टूरटूर' या नाटकाने त्यांना लोकमान्यता, तर 'विच्छा माझी पुरी करा' या नाटकाने राजमान्यता मिळवून दिली. या नाटकाचे विजय कदम यांनी १९८६ पासून ७५० हून अधिक प्रयोग केले.
दरम्यान, मराठी चित्रपट क्षेत्रावरही त्यांनी स्वतःची पकड मजबूत ठेवली होती. 'चष्मेबहाद्दर', 'पोलीसलाईन', 'हळद रुसली कुंकू हसलं' आणि 'आम्ही दोघं राजा राणी' अशा अनेक चित्रपटांत त्यांनी अभियनाची छाप सोडली होती. त्यांच्या अकाली निधनामुळं मराठी चित्रपटसृष्टीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना अनेक कलावंत आणि चाहत्यांनी व्यक्त केलीय.