सोलापूर : विजापूर नाका पोलीस ठाण्याकडील पोशि अमृत सुरवसे व पोशि सिध्देश्वर स्वामी असे दोघे पोलीस स्टेशन हद्दीत रात्र गस्तीदरम्यान पेट्रोलिंग करीत असताना बुधवारी, १० जुलै रोजी पहाटे ०४. ४५ वा. च्या सुमारास कर्नाटक पासिंग असलेल्या ०२ चारचाकी गाड्या एका मागोमाग वेगाने सोरेगांवच्या रस्त्याने येत असल्याचे दिसून आल्या. त्या संशयित वाहनांची झडती घेता, दरोडा घालण्याच्या तयारीने निघालेली आंतरराज्य टोळी पोलिसांच्या तावडीत सापडलीय. त्यांच्या ताब्यातून दोन चार चाकी वाहने आणि दरोड्यास लागणारे साहित्य असा एकूण २३ लाख रुपयांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, बुधवारी पहाटे सोरेगावकडून निघालेल्या दोन्ही चारचाकी गाड्यास टिकेकर वाडी रेल्वे ब्रीजच्या बोगद्याजवळ पोलिसांनी अडविले. त्या दोन्ही गाड्याची पाहणी केली असता, त्यात दरोड्यास लागणारे साहित्य दिसून आल्याने वरील दोन्ही पोलीस अमंलदार यांनी घरफोडीच्या अनुशंगाने रात्रगस्त करिता असलेले सपोनि गायकवाड, पोहेकॉ गणेश शिर्के व पोशि संतोष माने यांना त्या ठिकाणी बोलावून घेतले. त्यानंतर त्या संशयित ८ इसमांना लागलीच ताब्यात घेऊन त्याचे नाव पत्ता विचारता, चौकशीत टोळी प्रमुख कनकमुर्ती ज्ञानदेव गोंधळी (रा. गांधी नगर, स्टार चौक विजयपूर) याने, " आम्ही सर्वजण मिळून कुंभारी येथे जाऊन आमच्या ओळखीचा हबीब सरदार पठाण (रा. इंदिरा नगर, कुंभारी) याच्या मदतीने कुंभारी येथील अश्विनी हॉस्पीटल येथे दरोडा टाकण्यासाठी जात होतो " अशी कबुली दिलीय.
ही कामगिरी पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप आयुक्त - (परीमंडळ) विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त (विभाग -२) यशवंत गवारी, वरिष्ठ पोलीस निरिक्षक दादा गायकवाड, पो.नि. श्रीमती संगिता पाटील (गुन्हे) व गुन्हे प्रकटीकरण - पथक प्रमुख स.पो.नि. गायकवाड, पोहेकॉ सचिन हार, शंकर भिसे, गणेश शिर्के, पोना हुसेन शेख, पोकॉ संतोष माने, श्रीनिवास बोल्ली, अमृत सुरवसे, समाधान मारकड, सद्दाम आबादीराजे, राहुल सुरवसे, स्वप्निल जाधव, रमेश कोर्सेगाव, सिध्देश्वर स्वामी यांनी पार पाडली.
....... चौकट ......
...हे आहेत आंतरराज्य संशयित दरोडेखोर !
कनकमुर्ती ज्ञानदेव गोंधळी (रा. गांधी नगर, स्टार चौक विजयपूर), संजय मल्लप्पा पुजारी, समीर मक्तुमसाब कोलार, अभिषेक देवनांद बिरादर, लिंगय्या हिरय्या हिरेमठ, प्रविण मोनाप्पा बडीगेर ( सर्व रा-मु. पो. चिक्करुगी, ता देवरहिप्परगी जिल्हा- विजयपूर), आकाश बसवराज भासगी (रा. मु.पो. सुरगीहळ्ळी ता. सिंदगी, जिल्हा विजयपूर) आणि रमेश महादेवप्पा सालोडगी (सर्व रा. कर्नाटक) त्या अंतरराज्य टोळीतील टोळी प्रमुख कनकमुर्ती ज्ञानदेव गोंधळी असल्याचंही चौकशी पुढं आलंय.
..... चौकट ....
संशयितांजवळ मिळाले हे साहित्य
या कामगिरीत संशयित दरोडेखोरांजवळून दरोड्यास लागणारे एक लोखंडी कटर, एक लाल रंगाची घरगुती गॅस टाकी, एक ऑक्सिजन गॅस टाकी, रबरी पाईपसह प्रेशर रेग्युलेटर गॅस कटर, एक लोखंडी कटावणी, एक लोखंडी पाना, एक अॅगजेस्टेबल पाना, चार नवीन काळ्या रंगाचे टि-शर्ट, एक जुना काळा टि-शर्ट, ४ तोंडाचे काळे मास्क, ९ जोड रबरी पांढऱ्या रंगाचे हँन्ड ग्लोज, एक काळ्या रंगाचा स्कार्फ, एक निळ्या रंगाचा सॅक त्यामध्ये प्लॅस्टीकचे दोन धान्याचे रिकामी पोते, एक दुचाकी, २ चारचाकी गाड्या, ९ नग विविध कंपनीचे मोबाईल असा एकूण २३,६६,८५० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले.