(संग्रहीत छायाचित्र)
सोलापूर: प्रहार चे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी यांच्यावर खोटा खंडणीसारखा गुन्हा दाखल केल्यावर चर्चेत आलेले मोहोळ तालुक्याचे तत्कालीन तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्यावर गुरुवारी निलंबलाची कुऱ्हाड कोसळलीय. तहसीलदार बेडसे यांच्या प्रतापाविरूध्द प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून वेळोवेळी अनेक आक्रमक आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून घेण्यात आले होते. राज्य शासन व विभागीय आयुक्ताकडे वारंवार तक्रार करून तहसीलदार प्रशांत बेंडसे यांच्यावर निलंबनाची कारवाईची मागणी केली होती. गुरुवारी बेडसे यांच्या निलंबनाचे आदेश पारित झाल्यावर प्रहार जनशक्तीने मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केलाय.
कोविड काळात मोहोळ तालुक्याचा तहसीलदार पदाचा कार्यभार सांभाळणारे प्रशांत बेडसे यांचा पदभार घेतल्यानंतर अनेक नागरिकांशी वाद-विवाद झाला होता. प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत सुद्धा त्यांनी असभ्य वर्तन करत अपमानास्पद वागणूक दिली होती.
सर्वसामान्य नागरिकांना अपमानास्पद वागणूक देणे, पदावर असताना कोविड-१९च्या नियमांचे उल्लंघन करणे, वकिलांना अपमानास्पद वागणूक देणे, खोटे गुन्हे दाखल करणे, अशा प्राप्त तक्रारीवरून राज्य शासनाने निलंबनाचे आदेश पारित केला. प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत प्रशांत बेडसे थेट भिडले होते. महाराष्ट्र शासनच्या वतीने गुरूवारी, ११ जुलै रोजी महसूल वन विभागाने निलंबित केल्याचे आदेश पारित केले आहे.
शहर प्रमुख अजित कुलकर्णी मोहोळमध्ये हजर नसताना तसेच कोणत्याही प्रकारे खंडणीची मागणी केली नसता, त्यांच्यावर खंडणीसारखा गुन्हा दाखल झाल्याने प्रहारने उच्च न्यायालयातही दाद मागितली होती. राज्य शासनाच्या महसूल विभागात प्रहार पक्षाच्या अजित कुलकर्णी, जमीर शेख, खालिद मणियार आदींनी पाठपुरावा करत मोहोळ तालुक्याचे तत्कालीन तहसीलदार यांना निलंबित करावं, अशी मागणी लावून धरली होती.
तहसीलदार प्रशांत बेंडसे हे मोहोळ येथून बदली होऊन गेले, ते हल्ली पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याचे तहसीलदार कार्यरत होते. तत्कालीन तहसीलदार प्रशांत बेडसेवर निलंबनाची कारवाई झाल्याने प्रहार पक्षाने आनंदोत्सव साजरा करत मिठाईचं वाटप केलंय.