Type Here to Get Search Results !

गुलशन नगर उर्दू शाळेच्या इमारतीला गळती


धोकायदायक स्थितीत भरताहेत वर्ग; विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांची जीव टांगणीला 

मोहोळ/यासीन अत्तार : गुलशन नगरातील उर्दू शाळेची इमारत अत्यंत धोकायदायक झाली असून येथील विद्यार्थी व शिक्षकांचा जीव टांगणीला लागलेला आहे. पावसाचे चार थेंब पडले, तर वर्गात सर्वत्र पाणी साचतंय. ही इमारत तात्काळ दुरुस्त करण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष बिलाल मुबारक शेख यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे दिलाय.

जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळेत इयत्ता पहिली ते इयत्ता सातवी चे वर्ग भरतात. या शाळेचा एकूण पट ९५ इतका आहे. शाळेमध्ये शिक्षक संख्या ३ आहे. फक्त ४ खोल्यामध्ये वर्ग शिकविले जातात. या शाळेच्या मुख्याध्यापक ऑफिसमध्ये पावसाचे पाणी इमारतीच्या स्लॅबला गळती लागल्यामुळे साचलेल्या पाण्यात वर्ग भरवायचे कसे असा सवाल शिक्षकांनाही सतावतोय.

अपुऱ्या खोल्या, अधिक वर्ग या विषम समीकरणात एका खोलीत दोन-तीन वर्ग भरवावे लागतात. त्यामुळे एका खोलीत दोन वर्ग शिकवणाऱ्या शिक्षकांना त्यांनी शिकविलेले विद्यार्थ्यांना कितपत कळलं असावं, हा संशोधनाची बाब आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडवावे, अशी जिल्हा परिषदेची 'मनिषा' असेल तर इथं आणखी एका उर्दू शिक्षकाचे नेमणूक होणे गरजेचे आहे, असेही बिलाल शेख यांनी म्हटलंय.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुलशन नगर शाळा इमारतीच्या दुरुस्तीचे काम तात्काळ करून पावसाळ्यात विद्यार्थ्यांचे होणारे हाल थांबवावेत, त्या शाळेत आणखी एका उर्दू शिक्षकाची नेमणूक करावी, अशा बिलाल शेख यांची मागणी आहे. याकडे पंचायत समिती, जिल्हा परिषद या जबाबदार विभागांनी गुलशन नगर शाळेतील विद्यार्थ्यांची समस्या संपवावी, त्यांची होणारी हेळसांड थांबवावी, असंही शेख यांनी म्हटलं असून अन्यथा आंदोलन अटळ असल्याचे त्यांनी सांगितले.

 या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी सोलापूर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी (प्राथमिक) यांनाही पाठविण्यात आल्या असल्याचेही बिलाल शेख यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.