सोलापूर : सोसायटी निवडणुकीत राजकीय विद्वेषातून बांधकाम व्यवसायिक अण्णाराव प्रभाकर पाटील (रा. जुना संतोष नगर, सोलापूर) यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चैन आणि पाऊण लाखाची रोकड जबरदस्तीने काढून घेतल्याच्या आरोपातून आरोपी पोलीस कर्मचारी नागनाथ गुरुबाळ बिराजदारसह अन्य ४ आरोपींची सोलापूर येथील मुख्य न्याय दंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी निर्दोष मुक्तता केली.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे वडगांव विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे सन 2021-22 ते सन 2026-27 करिता निवडणूक लागलेली होती. या निवडणुकीच्या कार्यक्रमाप्रमाणे, 18 एप्रिल 2022 रोजी नामनिर्देशन फॉर्म परत घेण्याची अंतिम तारीख होती. त्या दिवशी बांधकाम व्यवसायिक अण्णाराव पाटील हे त्यांचा मित्र शिवशंकर जवळगे यांच्यासोबत नवल पेट्रोल पंपासमोर असलेल्या दुय्यम उपनिबंधक सहकारी संस्था येथील कार्यालयासमोर आले होते.
त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी नागनाथ गुरुवाळ बिराजदार आणि अन्य तिघांनी (सर्व रा. वडगांव) यांनी पाटील व त्यांच्या मित्राजवळ येऊन त्यांना शिवीगाळ करून, 'तुझ्यामुळेच निवडणूक लागलेली आहे', असे म्हणून उभयतांना बेदम मारहाण करून फिर्यादीच्या गळ्यातील दीड तोळा सोन्याची चैन व ७५ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून घेतल्याची फिर्याद अण्णाराव पाटील यांनी सदर बझार पोलीस ठाण्यात दाखल केली.
त्यानुसार पोलीस कर्मचारी नागनाथ बिराजदार आणि त्यांच्या अन्य साथीदारांविरुद्ध भादवि कलम 327, 323, 143, 147, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल झालेला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक बेंबडे, पोलीस उपनिरीक्षक रमेश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक सुनील अंकोलगीकर, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक सचिन माळी यांनी तपास पूर्ण करून आरोपींविरुद्ध येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.
या खटल्याची सुनावणी मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांच्या न्यायालयात झाली. सरकार पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये जखमी फिर्यादी, फिर्यादीचा मित्र, घटनास्थळाचे पंच, व एकूण ५ तपासिक अधिकारी असे साक्षीदार तपासण्यात आले. या खटल्यात अंतिम युक्तिवाद करत असताना आरोपित पोलीस कर्मचारी व अन्य आरोपींचे वकील अॅडवोकेट रियाज शेख यांनी आरोपींची बाजू मांडली.
एकंदरीत आरोपींच्या वतीने अॅडवोकेट रियाज शेख यांनी केलेला युक्तिवाद विचारात घेता, मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमान विक्रमसिंह भंडारी यांनी पोलीस कर्मचारी नागनाथ गुरुबाळ बिराजदार, इराण्णा रमेश रासुरे, नागनाथ महादेव दिंडोरे, श्रीशैल गुरुबाळ बिराजदार या ४ आरोपींची सबळ पुराव्याअभावी संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्त करण्याचे आदेश पारित केले.
या खटत्यामध्ये आरोपीतर्फे अॅडवोकेट रियाज एन. शेख यांनी तर सरकार पक्षातर्फे अॅडवोकेट अमर डोके यांनी काम पाहिले.