हाथरसमध्ये मंगळवारी झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत १३४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, बाबा जाण्यापूर्वी सर्व काही ठीक होते. मात्र बाबांचा ताफा पंडालच्या ठिकाणाहून निघताच लोक नियंत्रणाबाहेर गेले.
या दुर्घटनेत शंभरहून अधिक लोक गंभीर जखमी आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली आहे. सीएम योगी यांनी मृतांबाबत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जखमींना ताबडतोब रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या.
भोले बाबाचा होता प्रवचनाचा कार्यक्रम
हातरस येथील सिकंदरराव कोतवाली भागातील फुलराई गावात भोले बाबाचा प्रवचनाचा कार्यक्रम सुरू होता. अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाल्याने एकच गोंधळ उडाला. एका अंदाजानुसार सव्वा लाख लोक या सत्संगासाठी एकत्र आले होते.
गर्दीमुळे लोकांचे हाल होऊ लागले. उन्हामुळे लोक बेशुद्ध झाले आणि नंतर चेंगराचेंगरी झाली. लोक जमिनीवर पडले, तेव्हा इतर लोक त्यांना चिरडून बाहेर येऊ लागले. माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शेकडो गंभीर लोकांना रुग्णालयात दाखल केलंय. सर्वत्र आक्रोश अन् मृतदेह दिसत होते, असं प्रत्यक्षदर्शी अन् माध्यम प्रतिनिधींचं वृत्त आहे.