सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका ऍग्रो कंपनीच्या बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झालाय. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नातेवाईक आणि ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे. संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर तसेच त्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची चौकशी करून पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भीमाशंकर जमादार यांनी केलीय.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील प्रशांत पंडित बिराजदार (वय-३२ वर्षे) असं मरण पावलेल्या तरुणाचं नाव आहे. तो मागील काही दिवसांपासून मार्केट यार्ड परिसरात एका ऍग्रो कंपनीच्या सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी सेंट्रींगवर कामाला जात होता. सोमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक त्याचा मृत्यू झाला. नातेवाईकांना समजल्यानंतर तो बांधकामाच्या ठिकाणी काम करताना पडून मेल्याचे सांगण्यात आले.
बांधकाम कॉन्ट्रॅक्टर याच्या सांगण्यावरून प्रशांत बिराजदार याचा मृत्यू पडून झाल्याचे सांगितले जाते, परंतु त्याच्या पाठीवर, पोटावर, गळ्याला असलेले मारहाणीचे व्रण यावरून त्याचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईक तसेच ग्रामस्थांनी व्यक्त केलाय.