सोलापूर : दोन दिवसापूर्वी झालेल्या वाद-विवादाचे कारणावरुन घरासमोर उभ्या केलेल्या दोन दुचाकी बऱ्हाणपुरे कुटुंबातील सर्व जण झोपेत असताना पेटवून देण्यात आल्या. ही घटना उत्तर सदर बझार परिसरातील सतनाम चौक भागात शुक्रवारी मध्यरात्री घडलीय. याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
विकी नागेश बंडेल्लु, सिध्दप्पा कट्टीमनी आणि परमेश्वर शंकर मांजरेकर अशी संशयितांची नांवे आहेत. त्यांनी ४ जुलै रोजी झालेल्या वादविवादातून राजेश लक्ष्मण बऱ्हाणपुरे (वय ३० वर्षे, रा. उत्तर सदर बझार, सतनाम चौक) यांच्या घरासमोर उभी केलेली अॅक्टीवा मोटार सायकल (एम एच १३ सी वाय २९८३) व होंडा स्प्लेंडर आय स्मार्ट ११० मोटार सायकल (एम एच १३ सी एल ६५४७) या दोन मोटार सायकलीस कशाने तरी आग लावून पेटविल्या.
त्यात मोटार सायकलीचे नुकसान झाल्याची फिर्याद राजेश बऱ्हाणपुरे यांनी सदर बझार पोलिसांकडे दाखल केलीय. त्यानुसार विकी बंडेल्लु आणि अन्य दोन जणांविरुध्द भा न्या सं ३२४ (२), (६),३२६ (एफ) प्रमाणे गुन्हा दाखल झालाय. पोलीस नाईक माडे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.