Type Here to Get Search Results !

...लाडकी बहीण योजना; शुल्क आकारलेल्या ०२ नेट कॅफे चालकांविरुद्ध गुन्हे दाखल


सोलापूर :  'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना राबविताना फॉर्म भरून घेण्यासाठी लाभार्थी महिलेकडून कोणतीही फी ची रक्कम न आकारता अपेक्षित असताना फॉर्म भरणाऱ्या महिलांकडून १०० रुपये व २०० रुपये घेतल्याचा प्रकार उजेडात आलाय. या प्रकरणी ०२ नेट कॅफे चालकाविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हे दाखल करण्यात आले.

सात रस्ता परिसरातील प्रगती नीट कॅफे व योगेश्वर नेट कॅफे अशी त्यांची नावे आहेत. या नेट कॅफेमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यास इच्छुक असलेल्या महिलांकडून त्यांनी शासन निर्णयाचा आदर करून फॉर्म भरणे अपेक्षित असताना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी १०० रुपये व २०० रुपये घेऊन अर्ज भरल्याचा दोन्ही नेट कॅफे चालक व मालकावर आरोप आहे. 

याप्रकरणी उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाच्या मंडलाधिकारी सारिका कल्याण वाव्हळ यांनी सदर बझार पोलिसांकडे फिर्याद दाखल केलीय. ते दोन्ही नेट कॅफे अधिकृत ई महा सेवा केंद्र नसल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी दोन्ही नेट चालकाविरुद्ध भा न्या सं ३१८(२),३१८(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस उपनिरीक्षक शिंदे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.