धाराशिव : सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता नुकतीच प्राप्त झाली असून, ही संच मान्यता ऑनलाइन पोर्टल वरील आधार व्हॅलीडेशन नुसार करण्यात आलेली आहे. त्याऐवजी प्रत्यक्ष पटावरील विद्यार्थी उपस्थिती ग्राह्य धरून सुधारित संचमान्यता करण्याची मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आलीय.
या संचमान्यतेमध्ये आधार कार्ड नसणाऱ्या किंवा आधार कार्डवरील नावामध्ये असणाऱ्या किरकोळ चुकीमुळे तसेच काही तांत्रिक कारणामुळे विद्यार्थी संख्या कमी दर्शवली गेल्याने सहशशिक्षक, प्राथमिक पदवीधर व मुख्याध्यापकाची अनेक पदे अतिरिक्त ठरलेली आहेत. प्रत्यक्ष शाळेचा पट व आवश्यक विद्यार्थी उपस्थिती असतानाही आधार व्हॅलिडेशन न झाल्यामुळे अनेक पदे अतिरिक्त ठरलेली आहेत.
तरी शाळेचा पट व वर्गातील प्रत्यक्ष विद्यार्थी उपस्थिती याची क्षेत्रीय आधिकारी यांच्यामार्फत पडताळणी करूनच नवीन सुधारित संच मान्यता जाहीर करण्यात यावी, असे निवेदन सोमवारी, ०८ जुलै रोजी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ धाराशिव च्या वतीने महाराष्ट्र राज्याचे शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त व धाराशिव जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले.
या निवेदनावर राज्य उपाध्यक्ष लालासाहेब मगर, राज्य कार्यकारणी सदस्य बशीर तांबोळी, राज्य महिला कार्यकारिणी सदस्य सविता पांढरे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, जिल्हा सरचिटणीस अविनाश मोकाशे, जिल्हा चिटणीस महेबूब काझी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.