मोहोळ : हातातील मोबाईल ज्ञानसाधनेचे कारण न बनता विसरण्याचे साधन बनले आहे. गुगल म्हणजे समुद्र आहे, तेथून मोती काढायचे की चिखल काढायचा, हे विद्यार्थ्यांनी ठरवावे. भंजन म्हणजे रंजन असा काळ आला आहे. तारुण्यात चुकलो तर आयुष्यात यु-टर्न नाही. त्यामुळे धावतो तो झरा आणि थांबतो ते डबके हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे, असे आवाहन बहुजन शिक्षक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी केले.
रविवारी महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या मोहोळ तालुका यांच्यावतीने आयोजित केलेल्या प्राथमिक शिक्षक सोसायटी सभागृहात मोहोळ तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मोहोळ तालुक्याचे नायब तहसीलदार सुधाकर धाईंजे, मोहोळ पोलीस ठाणेचे अंमलदार गोपाळ साखरे, महासंघाचे राज्य सरचिटणीस बोधीप्रकाश गायकवाड, राज्य संघटक अशोक पाचकुडवे, राज्य उपाध्यक्ष उपप्राचार्य प्रकाश शिंदे, जिल्हाध्यक्ष युवराज भोसले, जिल्हा सचिव रवी देवकर, प्रकाश साळवे, प्रफुल्ल जानराव, मुख्याध्यापक नितीन गायकवाड, दाऊत आतार, अभियंता शशिकांत ठोकळे, शोभा चंदनशिवे, भीमराव नवगिरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी अण्णासाहेब भालशंकर अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर गुणवंत विद्यार्थी आणि पालकांचा सन्मानपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. याच कार्यक्रमांमध्ये बाळासाहेब कारंडे व अण्णासाहेब कसबे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी नायब तहसीलदार सुधाकर धाईंजे म्हणाले, विद्यार्थ्यांचे ध्येय पालकांनी नव्हे तर विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेतच निश्चित करा. त्यासाठी विद्यार्थ्यांनी दिनक्रम ठरवून त्यानुसार उच्च शिक्षण घेऊन जिद्द,चिकाटीने स्वतःच्या पायावर उभे रहा, असे सांगत महापुरुषाचे शैक्षणिक कार्य महासंघाच्या वतीने पुढे घेऊन जाणाऱ्या बहुजन शिक्षक महासंघाचे कौतुक केले.
यानंतर पोलीस ठाणेचे अंमलदार गोपाळ साखरे, महासंघाचे राज्य सरचिटणीस बोधीप्रकाश गायकवाड, उपप्राचार्य प्रकाश शिंदे, रवी देवकर यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य संघटक अशोक पाचकुडवे यांनी केले. सूत्रसंचालन युवराज भोसले यांनी केले तर मोहोळ तालुका अध्यक्ष शिवाजीराव जगताप यांनी आभार मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अण्णासाहेब गवळी, प्राचार्य बशीर बागवान, मनोजकुमार खडके, शामराव गजघाटे, संदीप निस्ताने, स्वप्नजा कसबे, नागनाथ गायकवाड, नागनाथ कसबे, राजकुमार वसेकर, विदुर शेळके, प्रा.शंकर काळे, रवी शिंदे, सदानंद कोळी आदींनी परिश्रम घेतले.