सोलापूर : जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत एकूण 252 कामांना मंजुरी देण्यात आलेली होती. ही सर्व कामे माहे ऑगस्ट 2024 अखेर पर्यंत सर्व संबंधित यंत्रणांनी पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा, उपविभागीय जलसंधारण अधिकारी आर. डी. क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे जलसंधारण अधिकारी एस. एस. पारसे, भीमा पाटबंधारे विभाग पंढरपूरचे कार्यकारी अभियंता सोमेश्वर हरगुटे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी सी. एस. सोनवणे यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, संबंधित प्रकल्पातील गाळ काढल्यास तेथील पाण्याची साठवण क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तसेच काढलेला गाळ शेतकऱ्यांच्या शेतात टाकल्यास त्या शेतीचे उत्पादन क्षमता वाढून शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन वाढून त्यांना आर्थिक लाभ मिळेल. यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी गाळ काढण्याची मंजूर कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे, असे त्यांनी सूचित केले.
जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत एकूण 252 कामापैकी 93 कामे पूर्ण झालेली आहेत, तर सद्यस्थितीत 14 कामे सुरू आहेत. अद्याप सुरू न झालेल्या कामांची संख्या 77 इतकी आहे आणि 68 कामे रद्द करण्याची शिफारस संबंधित यंत्रणांनी केलेली आहे, अशी माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी दामा यांनी बैठकीत दिली.
जिल्ह्यात सन 2023 ते आतापर्यंत 106 पूर्ण झालेल्या कामातून जवळपास 65 लक्ष घनमीटर इतका तर सन 2024 मधील 14 अपूर्ण कामांमधून 7.32 लक्ष घनमीटर इतका काळ काढण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच या 252 कामापैकी जलसंधारण विभाग सोलापूर 35, सोलापूर पाटबंधारे विभाग 74, जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग 122, भीमा पाटबंधारे विभाग पंढरपूर 16, भीमा विकास विभाग (क्र. 2) 2, नगरपरिषद अक्कलकोट 1 व उजनी धरण व्यवस्थापन विभाग भीमा नगर 2 अशी यंत्रणांनिहाय कामांना मंजुरी प्रदान करण्यात आलेली होती.