(प्रतिकात्मक छायाचित्र)
मोहोळ/प्रतिनिधी : विना परवाना वाहनात अवैधरित्या जनावरे भरून अमानुष वाहतूक करीत असलेल्या वाहनास मसपोनि अंजना फाळके यांनी ताब्यात घेतले. ही घटना पुणे महामार्गावरील जयशंकर हॉटेलजवळ रविवारी सकाळी निदर्शनास आली. याप्रकरणी ते वाहन ताब्यात घेऊन चालकासह मोहोळ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. याप्रकरणी दोघांविरुद्ध दाखल गुन्ह्यात ०३, १०, ००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, रविवारी, १४ जुलै रोजी सकाळी लांबोटी येथील जयशंकर हॉटेल नजीकच्या शिरापूर रोडवर अशोक लेलैंड कंपनीचा फिक्कट पिवळ्या रंगाचा MH 16 CD 0421 क्रमांकाचा पिकअपमध्ये पाठीमागील हौदामध्ये जनावरांना त्याना वेदना होतील अशा स्थितीत ठेवून, दाटीवाटीने कोंबून, चारा-पाण्याची कोणतीही सोय न करता बिगरपास परमीटने वाहतूक केली जात असल्याचे मसपोनि फाळके यांच्या निदर्शनास आल्यावर जनावरांसह पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
या प्रकरणी पोकॉ/११६४ अमोल बापुराव जगताप यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार सागर प्रकाश कांबळे (वय-३५ वर्षे) आणि सुजीत आप्पाराव जाधव (दोघे रा. प्रभाकर महाराज मठ शेजारी, बुधवार पेठ, सोलापूर) यांच्याविरुद्ध प्राण्याचा छळ प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (घ), ११ (१) (ड), ११(१) (च),११(१) (झ),प्राण्यांचे परिवहन नियम १९७८ चे कलम ४७, ५४, ५६ व महा.पो.अधि.१९५१ चे कलम ११९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्या वाहनातील लहान मोठ्या चार गोवंशीय प्राणी व पिकअप असा ०३, १०, ००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. मसपोनि अंजना फाळके या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.