Type Here to Get Search Results !

विद्यार्थ्यांनी कुटुंबाचा व राष्ट्राचा आधारस्तंभ म्हणून पुढे यावं : अण्णासाहेब भालशंकर


मंगळवेढा : आपल्या वृद्ध आई-वडिलांना चार दिवस सुखाचे दिवस दाखवावे, लहान भावंडाचे शिक्षण किंवा नोकरीमध्ये हातभार लावावा, आपलेही एखादे हक्काचे छोटेसे घर असावे, आपल्या कुटुंबाला अन्न मिळावे या गोष्टीसाठी गुणवंत विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण पूर्ण करून आपल्या कुटुंबाचा आणि नंतर राष्ट्राचा आधारस्तंभ म्हणून पुढे यावे, असे आवाहन बहुजन शिक्षक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी केले.

महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या मंगळवेढा तालुका यांच्यावतीने श्री संत दामाजी महाविद्यालयात आयोजित केलेल्या मंगळवेढा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्त कर्मचारी तसेच नवनिर्वाचित मुख्याध्यापक सन्मान सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून भालशंकर बोलत होते. 

याप्रसंगी वित्त व लेखा अधिकारी अजित शिंदे, मंगळवेढा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बिभीषण रणदिवे, माजी प्राचार्य डॉ. एन. बी. पवार, प्राचार्य डॉ. औदुंबर जाधव, जि. प. अधिकारी अनिल पाटील, महासंघाचे सरचिटणीस प्राचार्य बोधिप्रकाश गायकवाड, रमेश लोखंडे, रवी देवकर, मंगळवेढा तालुकाध्यक्ष विठ्ठल एकमल्ली आदींची प्रमुख उपस्थिती होती.



प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर गुणवंत विद्यार्थी आणि पालकांचा सन्मानचिन्ह, गुलाबपुष्प, लेखणी आणि पुस्तक देऊन गौरव करण्यात आला.

मंगळवेढा तालुक्यातून तीनशेपेक्षा अधिक विद्यार्थी अधिकारी झालेले आहेत, यांचा आदर्श घेऊन उपस्थित गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या तालुक्याचा नावलौकिक आणखी वाढवावा, असे आवाहन शासनाचे वित्त व लेखा अधिकारी अजित शिंदे यांनी याप्रसंगी बोलताना केले.

गटशिक्षणाधिकारी बिभीषण रणदिवे म्हणाले, गुणवंत विद्यार्थ्यांनी महासंघाने दिलेल्या महापुरुषांच्या चरित्र पुस्तकांचे वाचन करून समोर आलेल्या संकटावर मात करून उज्वल यश मिळवावे, असे मत व्यक्त केले.


त्यानंतर महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर यांच्या हस्ते सिद्धेश्वर अवघडे यांना मंगळवेढा तालुका सचिव म्हणून नियुक्तीपत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सिद्धेश्वर अवघडे यांनी यांनी केले तर मंगळवेढा तालुकाध्यक्ष विठ्ठल एकमल्ली यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवकुमार स्वामी, नितीन मोरे, खंडू कोकरे, सोमनाथ माळी, शंकर माळी, संदीप ढगे, शहाजी ढोबळे, दिलीप चंदनशिवे, महेंद्र शिंदे, रवींद्र वाघमारे आदींनी परिश्रम घेतले.